पोलीस दलात कर्तबगारी दाखवलीच; पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी नशामुक्तीसाठीही केले मोलाचे कार्य

>>प्रसाद नायगावकर

‘सद् रक्षणाय, खल निग्रहणाय’ हे पोलीस दलाचे ब्रीद आहे. 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पोलिस दलातील कर्तव्यनिष्ठ कर्मचार्‍यांच्या कर्तबगारीचे कौतुक करण्यात येते. पोलीस दलात कर्तबगारी दाखवत सामाजिक बांधिलकी जपत समाज नाशमुक्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते कार्यरत आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दारूबंदीसाठी आणि तरुणांना नाशमुक्त करण्यासाठी मोठे योदगान दिले आहे. पोलीस दलातील आव्हाने पेलत त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे. दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटंबे उद्ध्वस्त होतात. मुलांची आबाळ होतात. ही परिस्थिती जवळून पाहिल्याने त्यांनी बदली झालेल्या प्रत्येक ठिकाणी नशामुक्तीची मोहिम उघडली आणि त्यात यशही मिळवले.

ज्ञानोबा देवकते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मानकादेवी या गावचे. 2000 मध्ये पीएसआय म्हणून पोलीस दलात त्यांची निवड झाली. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर देवकते चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस ठाण्यात रुजू झाले. 2002 ते 2003 मध्ये येथूनच त्यांनी दारूबंदीची चळवळ हाती घेतली. या भागा परिस्थिती बघता हे मोठे आव्हान होते. सुरुवातीला लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांना दारूबंदीसाठी प्रवृत्त केले. गावागावांमध्ये महिलांच्या समित्या, युवकांचे ग्राम रक्षक दल स्थापन केले. यातून जांबूळघाट, कवडशी, पाचगाव, नवतळा, डोमा, हिरापूर आदी 20 ते 25 गावे दारूमुक्त झाली. दारूबंदी अभियानामुळे प्रत्येक समितीतील 40 ते 50 महिला आणि ग्राम रक्षक दलातील 30 ते 40 युवक संपर्कात आल्याने त्यांच्या कार्याला बळकटी मिळाली.

गुन्हेगारी रोखण्यासाठी झाला फायदा
देवकाते यांच्या कार्याला पाठबळ मिळत असल्याने एखाद्या गुन्हेगाराला पकडणे, गुन्हा रोखणे यासारख्या कामात मदतही झाली. भिसीत असताना हिरासिंग बघेल नावाचा आंतरराज्यीय दरोडेखोर असताना या अभियानामुळेच सहज जेरबंद झाला. या दारूबंदीत वरिष्ठांचे सहकार्यही त्यांना मिळाले. भिसीतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बदली झाली. परंतु 52 ग्रामपंचायतींनी ठराव घेत देवकतेंच्या बदलीला विरोध करीत त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. भिसीतून बदली झाल्यानंतर देवकते यांनी नक्षलग्रस्त प्रभावी आंध्रप्रदेश बॉर्डरवर दोन ते तीन महिने कमांडो म्हणून कर्तव्य बजावले. त्यानंतर विरुर पोलीस ठाण्यात बदली झाली. हे नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान असल्याने येथे काम करणे आव्हानच होते. या आदिवासी बहूल भाग असलेल्या या परिसरातील गावांमध्येही दारूबंदीची चळवळ देवकतेंनी सुरू केली. राजुरा तालुक्यातील चिंचोली बु. येथे व्यसनमुक्तीवरील जनजागरण मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरव
बिटरगाव ठाणेदार म्हणून सुत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी ढाणकी वगळता 31 गावांत दारूबंदीचा यशस्वी पॅटर्न राबविला. होळीसारख्या सणाला दारू प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांचे प्रबोधन करत त्यांना दारुऐवजी दूध पिण्यास सांगत सण आनंदात साजरा करण्यात यश मिळवले. 2002 ते 2012 पर्यंत राबविलेल्या दारूबंदी अभियानाची दखलघेत राज्य शासनाने त्यांना 2012-13 च्या महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. बिटरगाव येथील 70 वर्षांपासून उर्सामध्ये तपाशाचे फड रंगायचे. त्या आड देहविक्री व्यवसाय चालायचा. यामुळे होणारे नुकसान लक्षात घेत त्यांनी 70 वर्षांची ही परंपरा मोडीत काढली. यावेळी ते कुठल्याही दबावाला बळी पडले नाहीत.याच ठिकाणी आठ किमीपर्यंत पाठलाग करून दरोडेखोरांना जेरबंद करण्याचे कसबही दाखविले. बिटरगावचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर यवतमाळ वाहतूक शाखा, नांदेड वाहतूक शाखेतही दमदार कामगिरी केली. गेल्या सहा महिन्यांपूर्वी देवकते यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्याची ठाणेदार म्हणून सूत्रे स्वीकारली. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्यांची दारुबंदी आणि नशामुक्तीती कामगिरी सुरू आहे.