नवीन वर्षाच्या प्रारंभी कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी निघालेल्या कल्याण येथील भाविकांवर काळाने घाला घातला. भाविकांची झायलो आणि सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱया टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह तिघे ठार झाले, तर अन्य सातजण गंभीर जखमी झाले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात नगर-दौंड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर रविवारी (दि.31) सकाळी हा अपघात झाला. सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पो आणि महिंद्रा झायलो या दोन चारचाकी गाडय़ांची समोरासमोर भीषण धडक झाली.
शेहबाज अजिज शेख (वय 30), गाझी रौफ शेख (13), लुझेन शोएब शेख (वय 13) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रिजवाना अजिज शेख (वय 57), रिम शोएब शेख (वय 32), फायजा शोएब शेख (वय 9), शादिन शोएब शेख (वय 11), सना अब्दुल रौफ शेख (वय 37), अब्दुल रहीम शेख (वय 8), मदिहा शेहबाज शेख (वय 27) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मृत आणि जखमी सर्व बैलबाजार, पश्चिम कल्याण, जिल्हा ठाणे येथील रहिवासी आहेत. या अपघातात दोन लहान मुलांना सुदैवाने कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
कल्याण येथील रहिवासी असलेले शेख कुटुंबीय बेलवंडी फाटामार्गे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी महिंद्रा झायलोमधून येत होते. रविवारी (दि. 31 डिसेंबर) सकाळी घारगाव परिसरात नगर-दौंड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात झायलो आणि समोरून भरधाव वेगाने नगरकडून दौंडकडे सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दोन लहान मुलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सातजण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच, भूषण बडवे, अनिल चौधरी, बापूराव निभोरे, विनायक चौधरी, अंकुश लगड, अजय राजेंद्र जाधव, डॉ. पानसरे आणि् पेट्रोल पंपावरील कर्मचाऱयांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.