>> नीलेश कुलकर्णी
‘नितीशबाबू को विस्मरण की बीमारी हो गयी है, उनको गद्दी छोडनी चाहिए’, अशा चर्चा बिहारच्या राजकारणात असताना नितीशबाबूंनी एक तिरपागडी चाल खेळली आहे. संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदावरून लालूधार्जिण्या लल्लन सिंग यांना त्यांनी हटवले आहे. त्या जागी स्वतःची वर्णी लावून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची भक्कम केली आहे. नितीश कुमारांची खुर्ची भाजप व राष्ट्रीय जनता दल या दोन्ही पक्षांना हवी आहे आणि ती सोडायला नितीशबाबू तयार नाहीत. त्यातूनच बिहारचे राजकारण सध्या गिरक्या घेत आहे.
भाजपसोबत आघाडीस विरोध करणाऱ्या लल्लन सिंग यांना स्वतःच्या संयुक्त जनता दल या पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवून नितीशबाबूंनी भाजप व इंडिया आघाडी या दोन्ही आघाडय़ांना एक ‘संदेश’ दिला आहे. त्यावरून नितीशबाबूंची स्मरणशक्ती चांगलीच दांडगी असल्याचे दिसून आले आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाकडून सातत्याने नितीशबाबूंना टार्गेट केले जात असल्याने नितीश कुमारांनी लालूधार्जिण्या लल्लन सिंगांना हटवून लालूंना धक्का दिला आहे. जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेऊन नितीश कुमारांनी मध्यंतरी खळबळ उडवून दिली होती. मात्र त्यांचा हा निर्णय त्यांच्यावर बूमरँग झाला आहे. नितीश कुमारांची कुर्मी जात ही बिहारात अल्पसंख्य आहे. यादव व ओबींसींचा बोलबाला या जातीनिहाय जनगणनेत दिसून आला आहे. त्यानंतरच लालू यादवांनी चिरंजीव तेजस्वी यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. नितीश कुमारांना आजार झाल्याची उठलेली वावडी हा त्याच रणनीतीचा भाग मानली जाते. नितीश व लालू एकत्र आल्यानंतर वर्षभरात तेजस्वी यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्याचे डील झाले होते. मात्र आता नितीश कुमार हे ताकांस तूर लागू देत नसल्याचा लालू पक्षाचा दावा आहे. एकदा नितीश पायउतार झाले की, त्यांच्या खुर्चीसकट त्यांच्या पक्षाचा समाजवादी व्होटबेस आपल्याकडे खेचण्याचे लालूंचे मनसुबे आहेत, तर विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने भाजपलाही त्यांच्या व्होट बँकेत फाटाफूट घडवून आणायची आहे. त्यामुळे लालूंचा कंदील त्यांच्या हाती सोपवून भाजपचे कमळ हाती घेण्याचा नितीशबाबूंचा मानस आहे. तथापि, मुख्यमंत्रीपद सोडा आणि मगच आमच्याकडे या, असा भाजपचा निरोप असल्याने नितीश कुमारांची गोची झाली आहे. त्याचवेळी इंडिया आघाडी ही भाजपला पर्याय म्हणून सक्षमपणाने आकाराला येत आहे. या आघाडीत फूट पाडण्याची कारस्थाने दिल्लीकर मंडळींकडून रचली जात आहेत. नितीश कुमार या कारस्थानाचे बळी ठरतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नितीश कुमारांचे राजकारण आता अखेरच्या टप्प्यावर आहे. या राजकीय कोंडीतून नितीशबाबू सहीसलामत बाहेर पडणार की, त्यांच्या राजकारणाला पूर्णविराम मिळणार हे लवकरच समजेल.
महिला आरक्षणः भाजपचे खायचे दात
नव्याकोऱ्या संसद भवनात महिला आरक्षणाचे विधेयक पारित करून पंतप्रधान मोदींनी इतिहास घडविला असा जोरदार प्रचार भाजपाई मंडळींनी केला होता. मात्र महिला आरक्षण हा फक्त ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ आहे याचा प्रत्यय त्यानंतर सातत्याने आला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने महिला आरक्षणाचा ‘म’देखील उच्चारला नाही. तीन राज्यांत भाजपचे सरकार सत्तेवर आले. मध्य प्रदेशात कार्यक्षम खासदार असलेल्या रीती पाठक यांना महिला म्हणून मुख्यमंत्री बनवतील, अशी आवई उठविण्यात आली. प्रत्यक्षात त्यांना लोकसभेच्या सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवायला सांगितले आणि लोकसभेचे विधानसभेला निवडून आलेल्या सगळय़ा नेत्यांना मंत्री बनविण्यात आले. मात्र ‘अपवाद’ फक्त रीती पाठक यांना करण्यात आले. यावरून भाजपच्या ‘महिला आरक्षणाच्या धोरणा’चा अंदाज येतो. केंद्रात मंत्री असलेल्या रेणुका सिंग यांनादेखील छत्तीसगडमध्ये किमान उपमुख्यमंत्री केले जाईल असा अंदाज होता. मात्र त्यांचेही डिमोशन करण्यात आले. राजस्थानमध्ये दिया कुमारी यांना उपमुख्यमंत्रीपदाची ‘लॉटरी’ लागली ती महिला म्हणून नव्हे तर वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा खोडून काढण्यासाठी. राजघराण्याची पार्श्वभूमी असणाऱ्या महिला नेत्यांच्या ‘शोधा’त भाजप होती. तो शोध दिया कुमारी यांच्यापाशी येऊन थांबला म्हणून त्या किमान उपमुख्यमंत्री होऊ शकल्या. रीती पाठक, रेणुका सिंग व दिया कुमारी या तीन दिग्गज महिलांच्या बाबतीत भाजपने केलेल्या राजकारणावरून त्यांच्या महिला आरक्षणाच्या धोरणाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असल्याचे सिद्ध झाले आहे.
बृजभूषण का क्या होगा?
महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप असूनही उजळ माथ्याने फिरणारे भाजपचे खासदार व कुस्ती महासंघाचे माजी सर्वेसर्वा बृजभूषण सिंग यांचे काय होणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण यांचे ‘राईट हँड’ संजय सिंह निवडून आल्यानंतर केंद्रीय सरकारने हा कुस्ती संघच बरखास्त करून टाकला. त्यामागे निव्वळ व्होट बँकेचे राजकारण आहे. बृजभूषण हे पैसरगंजचे खासदार आहेत. गोंडा आणि आसपासच्या पाचेक लोकसभा मतदारसंघांत दबदबा असणारे ठाकूर आहेत. इतके दिवस योगी अदित्यनाथांना काटशह देण्यासाठी बृजभूषण यांच्या पाठिशी दिल्लीतले चाणक्य उभे होते. मात्र उत्तर प्रदेश, हरयाणा व राजस्थानातील जाट समाज भाजपाच्या विरोधात जातो आहे, हे लक्षात आल्याने कुस्ती महासंघ बरखास्तीचा निर्णय केंद्र सरकारला घेणे भाग पडले. कारण जाट की ठाकूर? या पेचात सध्या भाजप आहे. निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे या दोन्ही जातींना नाराज करून चालणार नाही. त्यामुळे कुस्ती महासंघ बरखास्त करून भाजपने जाटांमध्ये ‘फीलुगड’चा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. बृजभूषणांविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांवर काँग्रेसधार्जिणे असल्याचा शिक्का भाजपने अगोदरच मारलेला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत हेच पैलवान बृजभूषण यांच्या विरोधात प्रचारासाठी मैदानात उतरले तर भाजपची गोची होणार आहे. त्यामुळेच बृजभूषण यांचे तिकीट कापण्याच्या हालचाली सुरू आहेत.उत्तर प्रदेशातील सर्व पक्ष फिरून आलेल्या बृजभूषण यांचे आता काय होते ते बघायचे.