व्याजाने घेतलेली रक्कम परत करुनही आणखी पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास त्यांच्या नावावरील जमीन बळजबरीने यातील आरोपीचे नावावर करण्यासाठी संगनमत करुन तक्रारदारांना त्यांच्यायच गाडीत किडनॅप व मारहाण करत डांबून ठेवल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 11 लाखांच्या मुद्देमालासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथे राहणाऱ्या शुक्लेश्वर उत्तम भुजाडे (50) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार शरद आनंदराव गायकवाड, त्यांचा भाऊ दत्तु आनंदराव गायकवाड, सुनिल भुजबळ,नारायण जाधव व प्रतिक उर्फ खंडु शरद गायकवाड, चेतन प्रभाकर मोरे,शैलेश राजेद वाघ व एक अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी शरद आनंदराव गायकवाड,खंडु शरद गायकवाड यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्हयातील दोन आरोपी शैलेश राजेद वाघ व चेतन प्रभाकर मोरे यांची नावे सांगत या गुन्ह्यात वापरलेली इरटिगा गाडी ही चेतन प्रभाकर मोरे यांची असल्याचे सांगितल्याने चेतन प्रभाकर मोरे यांना अटक करण्यात आली असून गुन्हयात वापरलेली इरटिका गाडीसह अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्हयात वापरण्यात आलेल्या दोन मोटर सायकल असा एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कामगरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोहेकों/लांडे, पोकों/वाघ, पोकों/कोतकर, पोकॉ/घनवट, पोकॉ/राजु शेख, पोकॉ/सानप, पोकों/आरवडे यांचे पथकाने केली आहे.