मलबार हिल टेकडीजवळ देशातला पहिला ‘ट्री-वॉक’!सिंगापूरच्या धर्तीवर पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

मुंबईला स्वच्छ-सुंदर आणि पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविण्यात येत असून आता मलबार हिल टेकडी येथील कमला नेहरू उद्यानाजवळ देशातला पहिला ‘ट्री-वॉक’ प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. टेकडी परिसरातील निसर्गसौंदर्य, पक्ष्यांचा किलबिलाट याची अनुभूती या ‘ट्री-वॉक’वरून जाताना घेता येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठीच्या 18.44 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

पालिकेने या कामासाठी 12 कोटी 66 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या एच.एम.क्ही असोसिएट या कंपनीने तब्बल 49.95 टक्के दराने जादा निकिदा भरत हे काम 18 कोटी 99 लाख रुपयांत करून देण्याची तयारी दाखकली होती. पालिकेने काटाघाटी करून काढीक दर 39.96 टक्क्यांपर्यंत खाली आणला. त्यामुळे आता हे काम 18 कोटी 44 लाख 10 हजार 216.40 रुपये इतक्या किमतीत होणार आहे. दरम्यान, जादा दरावरून आज स्थायी समितीत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला असता हे काम 2018 च्या नियोजनावरून प्रस्तावित केले असले तरी सद्यस्थितीत स्टीलसह इतर सामग्रीच्या वाढलेल्या किमतींमुळे हा दर वाढल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले.

असा असणार ट्री-वॉक

  • गिरगाव चौपाटीवरून मलबार टेकडीवर जाणारी सिरी रोड ही पायवाट आहे. पायथ्यापर्यंत वाहनांसाठी डांबरी रस्ता, त्या पुढे टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्यांची पायवाट आहे. या पाऊलवाटेवरून टेकडीवर जाणाऱयांची संख्या मोठी आहे.
  • यात मुंबईकरांसह पर्यटकांचाही समावेश असतो. या ठिकाणीच पालिका ‘ट्री वॉक’ बांधणार आहे. सिंगापूरमध्ये याच पद्धतीचा ट्री वॉक आहे. झाडांमधून जाणारा हा मार्ग 750 मीटर लांबीचा असून त्याची उंची सुमारे दीड मीटरची प्रस्तावित असून रुंदी 2.4 मीटरची असेल.
  • ‘ट्री-वॉक’वरील पारदर्शक काचांमुळे आणि झाडाच्या सालीप्रमाणे पृष्ठभागामुळे नागरिकांना झाडांवरून चालत असल्याचा अनुभव येऊ शकतो. या मार्गात सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीक्ही लावण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक 150 मीटरवर आसनव्यवस्था असेल.