
>> विशाल अहिरराव ([email protected])
आजचा काळही संघर्षाने भरलेला आहे. मानवाचा मानवाशी, मानवाचा समाजाशी आणि मानवाचा निसर्गाशी विविध प्रकारे संघर्ष होत आहे. अनेक व्यक्ती, समाज (संघटना) मानवी मूल्य, मनुष्यत्व टिकवण्यासाठी लढा देत आहेत. त्यांच्या या लढय़ाला बळ देण्यासाठी गीतेसारखा पथदर्शक लाभला तर नक्कीच समाजात सकारात्मकता वाढेल. सत्त्व वाढीस लागेल. आपण केवळ जिवंत आहोत असे नाही, तर संघर्षमय जीवनात जीवन जगण्यासाठीचे बळ मिळेल.
आपण जीवन जगत आहोत की फक्त जिवंत आहोत? (Are we Living or just Existing?) धावपळीच्या जगात हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघायलाच हवा. यामधून मिळणारे उत्तर आपल्या जगण्याला वेगळे वळण देऊ शकते. नुसते श्वास घेण्याच्या प्रक्रियेला जीवन म्हणता येत नाही हे समजावण्यासाठी शेक्सपिअर लिहितो, `Even a worm will turn’, हल्ला झाल्यावर अळीसुद्धा वळते, प्रतिकार करते. जीवनात संघर्ष हे येणारच आणि अशा काळात प्रतिकारासाठी आपण तयार असलंच पाहिजे. मरत मरत जगण्यापेक्षा सत्यासाठी प्रतिकार करताना आलेले मरण हे जिवंतपणाचे, जीवन जगण्याचे लक्षण मानण्यात आले आहे. तेव्हा आपण जीवन जगतो आहोत का, हा प्रश्न पडलाच पाहिजे. प्रश्नोत्तरांतून आपल्या जीवनाचा रस्ता निश्चित करता येतो, जीवनाला नवे ध्येय मिळते आणि हीच आपली वैदिक परंपरा आहे. गुरू-शिष्याच्या प्रश्नोत्तरांतून उपनिषदे मिळाली. अशाच प्रश्नोत्तरांतून पवित्र ग्रंथ श्रीमदभगवद्गीतेचा जन्म झाला. प्रश्न मनाला अस्वस्थ करत असले तरी जीवन जगण्याची प्रेरणा देतात, लढण्याची जिद्द देतात. म्हणून प्रश्नांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचे आधुनिक मानसशास्त्रदेखील सांगते की, प्रश्न दाबू नका, त्यांची थट्टा उडवू नका, त्यांची उत्तरे द्या. नसेल माहीत तर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. कारण स्वतः पडलेल्या प्रश्नांचा शोध घेणाऱ्याची बुद्धीच जगाला काही नवीन देऊ शकते.
शत्रू समोर उभा ठाकलेला असताना आणि आपण त्याला निःसंकोचपणे पराभूत करणार असा विश्वास असलेल्या अर्जुनालादेखील प्रश्न पडला की, हे सारे कशासाठी? हे तर आपलेच आहेत. यांच्याशी लढून सत्ता, वित्त, वैभव मिळवण्यापेक्षा आपण आपल्यापरीने जीवन जगू शकतो. म्हणून ‘सीदिन्ति मम गात्राणि…’ शस्त्र त्याच्या हातून गळून पडत आहेत. अशा अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देत भगवान श्रीकृष्णाने जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान सांगितले. ते गेय तत्त्वज्ञान म्हणजे गीता. अशा गीतेचा सांप्रत समाजाला पथदर्शक म्हणून उपयोग होऊ शकतो का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. आज गीताजयंतीच्या निमित्ताने त्याचा विचार व्हायलाच हवा.
गीता केवळ अर्जुनासाठी मार्गदर्शक ठरली नाही, तर समाजात काही बदल करू पाहणाऱ्या व्यक्तीला या गीतेने बरेच काही दिले आहे. म्हणूनच गीतेचे महत्त्व ओळखून वैदिक संस्कृतीचे पुनर्स्थापक आद्य शंकराचार्यांनी ‘प्रस्थानत्रयी’मध्ये वेदउपनिषद, ब्रह्मसूत्रासोबत, श्रीमदभगवद्गीतेला स्थान दिले. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील गीतेचे तत्त्वज्ञान प्राकृत मराठीमध्ये आणून क्रांतिकार्य केले. जनसामान्यांना तिचे तत्त्वज्ञान पाजले. 19 व्या शतकात स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषाने जगभरात तिचे महत्त्व पोहोचवले. 20 व्या शतकात मंडालेच्या तुरुंगातून लोकमान्यांनी तिचे रहस्य मांडले. त्याची भुरळ क्रांतिकारकांवर इतकी होती की, शहीद भगतसिंग यांनी तुरुंगात असताना तिची प्रत वाचण्यासाठी मागवली होती. महात्मा गांधी आणि विनोबाजींनी गीतेला ‘आई’ म्हणून हाक मारली. गीता केवळ धर्मग्रंथ नाही, तर जीवनग्रंथ आहे असा विचार अलीकडच्या काळात पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवलेंनी मांडला. अनेक तत्त्ववेत्त्यांनीदेखील गीतेचे महत्त्व वेळोवेळी विषद केले आहे. विविध काळातील गीतेचे संदर्भ लक्षात घेतल्यावर गीतेचे महत्त्व कळते. ते प्रत्येक काळात दिसून आले आहे. संघर्ष आला की, प्रश्न आले आणि प्रश्न आले की, गीता आलीच.
बिघडलेल्या समाजासाठी किंवा समाज बिघडला म्हणून रडत बसणाऱयांसाठी गीता नाहीच. व्यक्ती किंवा समाज बदलत्या काळाला समजून मानवी मूल्य चिरंतन राहण्यासाठी धडपड करतात, प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखवतात, जगाला नवा दृष्टिकोन देण्यासाठी झटतात. त्यांच्यासाठी गीता पथदर्शक ठरते. सत्यासाठी लढणारा वर्ग कमी असतो, त्याला अनेकदा आपलाच वर्ग आपल्याविरुद्ध उभा दिसतो, त्यामुळे इच्छा असूनही हृदय सत्य मांडायला, खरे सांगायला धजत नाही. एकाकी वाटायला लागते, संघर्ष नकोसा होतो अशा व्यक्तीला गीता ‘क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते। क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप।।2.3।।’ सांगते. मी काही करू शकत नाही, समोरच्या वर्गाला बदलायचे नाही, तर मी का धडपड करू? माझा मी जगेन अशा दुर्बळ विचारांना काढून टाकण्यास गीता सांगते. सध्या रुग्णांना पहिले डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीर सफाईचे औषध दिले जाते. तसेच हा विचार म्हणजे मनाचे डिटॉक्सिफिकेशन म्हणावे लागेल. हृदयातील ही क्लिबता दूर झाली तर व्यक्तीचे मानसिक बल वाढते. म्हणून स्वामी विवेकानंद गीतेच्या या श्लोकावर जोर द्यायचे. सत्याच्या मार्गाने चालताना अनेकदा कोणी सोबत उभे राहण्यास तयार नसते. अशा व्यक्तीला ‘सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।15.15।।’ असे सांगत मी तुझ्यासोबत आहे असा आधार भगवंत देतो. हा आधार आतून येतो, बाहेरच्या आधारांपेक्षा मानसिक आधार अधिक परिणामकारक असतो. अशी व्यक्ती अनन्यसाधारण कार्यही पूर्ण करू शकते. आणि कालांतराने त्यांच्या जीवनाचे आकर्षण समोरच्या समूहाला होऊ लागते. त्यांचे हृदयपरिवर्तन होते. हा इतिहास आहे.
तेव्हा आजचा काळही संघर्षाने भरलेला आहे. मानवाचा मानवाशी, मानवाचा समाजाशी आणि मानवाचा निसर्गाशी विविध प्रकारे संघर्ष होत आहे. अनेक व्यक्ती, समाज (संघटना) मानवी मूल्य, मनुष्यत्व टिकवण्यासाठी लढा देत आहेत. त्यांच्या या लढय़ाला बळ देण्यासाठी गीतेसारखा पथदर्शक लाभला तर नक्कीच समाजात सकारात्मकता वाढेल. सत्त्व वाढीस लागेल. आपण केवळ जिवंत आहोत असे नाही, तर संघर्षमय जीवनात जीवन जगण्यासाठीचे बळ मिळेल.