दिल्लीत होत असलेले संमेलन अभूतपूर्व ठरेल – प्रतिभाताई पाटील

सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. दिल्लीत सुमारे 70 वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘रायगड’ या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतीश देसाई, अॅड. प्रताप परदेशी, शैलेश वाडेकर, अनुज नहार, संतोष देशपांडे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोड आदी उपस्थित होते.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सुमारे 70 वर्षांपूर्वी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते, तर स्वागताध्यक्ष बॅरिस्टर काकासाहेब गाडगीळ होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले होते.

संकेतस्थळाची वैशिष्ट्ये

  • संकेतस्थळाची निर्मिती करताना त्याची रचना साधी-सोपी आणि आकर्षक करण्यात आली आहे.
  • संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथ दालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे.
  • मराठी भाषा, महाराष्ट्र आणि दिल्लीचे संबंध यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप्स, पॉडकास्ट, न्यूज क्लिप्स पाहण्याची सोय आहे.
  • विश्वकोश या विशेष विभागातून मराठी साहित्य आणि साहित्यिकांविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.