
98 व्या मराठी साहित्य संमेलनाचे आज सूप वाजवले. संमेलनाच्या समारोपीय सत्रात महामंडळाने काही ठराव मांडले. यात संतोष देशमुख हत्याकांडाच्या ठरावाला बगल देण्यात आली.
मराठवाडा साहित्य परिषदेने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि धनंजय मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप या संदर्भात ठराव मांडला होता. मात्र राज्यातील एपूणच गुन्हेगारीच्या स्थितीकडे लक्ष वेधणारा ठराव मांडून साहित्य महामंडळाने मूळ ठरावाला अलगद बाजूला केले. त्याऐवजी महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, विद्यार्थ्यांचे मृत्यू, स्त्रियांवरील अत्याचार ही परिस्थिती चिंताजनक आहे. यासाठी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची आणि गुन्हेगारी मोडून काढण्याची नितांत गरज आहे, असा ठराव करण्यात आला. याशिवाय माजी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि रा. रं. बोराडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
अखेरच्या दिवशीही साहित्य संमेलनाची गर्दी ओसरली. अनेक जणांनी दिल्ली फिरणं पसंत केले. दिल्लीतील स्थानिकांचा सहभागही नव्हता. संमेलनाचा समारोप सोहळा रटाळ झाला. विशेष ट्रेनने दिल्लीत आलेल्या साहित्यप्रेमींची ट्रेन रात्री 10 वाजता सुटणार होती. त्यामुळे साहित्य प्रेमी परतीच्या वारीसाठी सज्ज होते.
99 वे संमेलन कुठे होणार?
पुढच्या वर्षी होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत चार ठिकाणाहून निमंत्रणे आली आहेत. इचलकरंजी, औदुंबर, चिपळूण आणि मसापची शाहुपुरी आणि सातारा शाखा येथून निमंत्रणे आली आहेत. 31 मार्चपर्यंत इच्छुकांना निमंत्रण पाठवता येईल, असे महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी सांगितले.
सीमावासीयांचा ठराव
गेली 68 वर्षे महाराष्ट्र सीमेवरील 865 गावातील सुमारे 25 ते 30 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत तसेच वीस वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे. ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे. हा वादग्रस्त सीमा भाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.