98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

पुढील वर्षी दिल्लीत होणाऱया 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार असतील. आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवार यांनी आज स्वागताध्यक्ष पद स्वीकारले. संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहे.

तब्बल 70 वर्षांनी दिल्लीत संमेलन होणार आहे. यापूर्वी 1954 साली दिल्लीला 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्राr जोशी तर उद्घाटक तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू होते. दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामुळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्य रसिक व्यक्ती व्हावी असा संयोजन समितीने प्रयत्न केला. त्यातून शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे, अशी संस्थेने विनंती केली आणि ती शरद पवार यांनी आज मान्य केली, असे सरहद संस्थेने सांगितले.

शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल, असा विश्वास आज सरहद संस्थेचे संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनीता राजे पवार तसेच संयोजन समितीचे डॉ. सतीश देसाई यांनी व्यक्त केला.