ओडिशात 15 महिन्यांत 94 हत्ती दगावले; वीज, रेल्वे आणि शिकाऱ्यांनी घेतला जीव

एकेकाळी हत्तींच्या वाढत्या संख्येसाठी प्रसिद्ध असलेल्या ओडिशावर आता हत्तींचे अस्तित्व जपण्याची नामुष्की ओढवली आहे. 2024 ते 18 मार्च 2025 पर्यंत अर्थात गेल्या 15 महिन्यांत 94 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 31 हत्ती विजेच्या धक्क्यामुळे ठार झाले. हे सरकारला पूर्णपणे टाळता आले असते असल्याचे मत पशुप्रेमींनी मांडले. वीज पडून, रेल्वेच्या धडकेत आणि शिकारीमुळे येथील हत्तींचे प्रमाण दिवसेंदिवस घटतेच आहे.

मागील 15 वर्षांत ओडिशातील तब्बल 1,191 हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. यापैकी 316 हत्तींचा शिकार आणि विजेच्या धक्क्यामुळे जीव गेला. रेल्वे आणि इतर वाहनांच्या धडकेत 52 हत्ती मृत पावले, तर 257 हत्तींच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच उशिरा झालेल्या शवविच्छेदन तपासणीमुळे काही शिकारीची प्रकरणे समोर आली नाहीत. यंदा आतापर्यंत सर्वाधिक 31 हत्तींना विजेच्या धक्क्यामुळे प्राण गमवावा लागला आहे. संबलपूर (8), खोर्दा (4) आणि अंगुल (4) हे जिल्हे याबाबतीत आघाडीवर आहेत.

15 वर्षे दुर्लक्ष

मागील 15 वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे ओडिशातील हत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 2010 मध्ये पर्यावरण मंत्रालयाच्या चौकशीत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची शिफारस करण्यात आली होती. तरीदेखील 213 हत्तींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. सरकारने वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला होता. तरीही काहीच अंमलबजावणी झाली नाही. 2017 मध्ये तर पाच हत्तींचा वीज पडून एकाच वेळी मृत्यू झाला होता.