कोस्टल रोडचे 91 टक्के काम पूर्ण; बोगद्यातील गळती रोखली

मुंबई महापालिकेच्या महत्त्काकांक्षी कोस्टल रोडचे 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे जलद गतीने सुरू असून वर्षाअखेरीपर्यंत हा पूर्ण मार्ग मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. दरम्यान, वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिकेच्या बोगद्यातील गळती रोखण्यासाठी गेले दोन आठवडे सुरू असलेले कामही मुंबई महापालिकेने पूर्ण केले आहे.

मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा, इंधन आणि वेळेची बचत करणारा, मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचा असलेल्या कोस्टल रोडचे काम टप्प्याटप्प्याने पूर्णत्वाकडे येत आहे. दरम्यान, हा वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन मार्गिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, यावरून वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.

न्हावा-शेवा उड्डाणपूलही कोस्टल रोडला जोडला जाणार

कोस्टल रोडला न्हावा-शेवा उड्डाणपूल म्हणजे अटल सेतूला जोडण्याचे कामही भर पावसाळ्यात सुरू आहे. त्यासाठी शिवडी ते वरळीला जोडल्या जाणा-या कोस्टल रोडपर्यंत मजबूत पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पिलरबरोबरच आवश्यक तो तोल सांभाळण्यासाठी सिमेंटचा वापर करून पाया मजबुतीची कामे सुरू आहेत.