राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होण्याची चिन्हे आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी अशा सुमारे 900 पदांना विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व प्रशासकीय लगबगीमुळे निवडणुकीची ‘घटिका समीप’ आल्याचा अंदाज मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईसह राज्यातील सर्वच जिह्यात जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या असून ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगर जिह्यातील महापालिका व विविध शासकीय यंत्रणांनी सुरू केलेल्या पूर्वतयारीचा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी आढावा घेतला होता.
लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांपासून कारकून, शिपाई अशा विविध पदांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या पदांची मुदत ऑगस्ट महिन्यात संपुष्टात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासोबत प्रशासकीय कामांसाठी विविध पदांवरील अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मुंबई, शहरापासून उपनगर जिल्हा तसेच महानगर प्रदेश आणि राज्यातल्या विविध जिह्यांत व तालुकास्तरावर विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी 922 पदांना पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असे सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी सांगतात.
n विधानसभा निवडणूक झाल्यावर कदाचित राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू होईल. दोन वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणूक झाली तर पुन्हा पालिका निवडणुकांच्या कामांसाठी विविध पदांवरील कर्मचाऱ्यांची गरज लागेल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत या पदांना मुदतवाढ देण्यात आल्याचा अंदाज मंत्रालयीन अधिकारी व्यक्त करीत आहेत.