अंगणवाडी सेविकेच्या 824 जागांसाठी 8 हजारावर अर्ज, अभियंता, बी.एड. पदवीधरांचा समावेश

घराला आर्थिक आधार देण्यासाठी ग्रामीण भागातील महिलाही चांगले शिक्षण घेत आहेत. परंतु, शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्यामुळे बेकारी वाढत असल्याचे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी आलेल्या हजारो अर्जावरून दिसून आलेले आहे. जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 824 जागांसाठी तब्बल ८ हजार ३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे बी.एड., डी.एड. सह अभियंता, पदवीधर असलेल्या महिलांचेही अर्ज आल्याचे जिल्हा परिषद बालकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 3 हजार 423 अंगणवाड्या आहेत. जवळपास सात हजार अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. मात्र, अजूनही जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ८२४ जागा रिक्त आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद बालविकास विभागातर्फे रिक्त जागांसाठी जाहिरात देण्यात आली. त्यानुसार अंगणवाड्यांमधील 824 जागांसाठी आतापर्यंत 8 हजार 39 अर्ज आले. यामध्ये फुलंब्री तालुक्यातून सर्वाधिक 102 रिक्त जागांसाठी तब्बल 1580 अर्ज जिल्हा परिषदेला प्राप्त झाले.

अंगणवाडी सेविकांसाठी इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण अपेक्षित आहे; पण डीएड, पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणी, महिलांनी या पदासाठी अर्ज केले. शैक्षणिक कागदपत्रांनुसार उमेदवारांना शंभर गुण दिले जातात. त्यात पूर्वी कुठे अध्यापन किंवा काम केल्याचा अनुभव असल्यास त्याला स्वतंत्र गुण आहेत. आता अर्ज करण्याची मुदत संपली असून, सध्या अर्जाची छाननी व कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. पडताळणीअंती प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर याद्या गावागावांत प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातील. प्राप्त हरकतींवर निर्णय झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर जागा 95, अर्ज 955

पैठण जागा 86, अर्ज 1094

गंगापूर जागा 142, अर्ज 976

कन्नड जागा 75, अर्ज 773

सिल्लोड जागा 39, अर्ज 370

वैजापूर जागा 167, अर्ज 968

रत्नपूर जागा 68, अर्ज 598

फुलंब्री जागा 102, अर्ज 1580

सोयगाव जागा 11, अर्ज 8039