लाडकी बहीण योजनेमुळे जनआरोग्य योजनेचे 889 कोटी रुपये थकले, मुंबईतच 68 कोटी रुपयांची बिलं थकित

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये दिले जातात. पण या योजनेमुळे जनआरोग्य योजनेसाठी सरकारडे पैसे नाहीत. जन आरोग्य योजनेचे कोट्यवधी रुपये सरकारने रुग्णलायांना दिलेच नाहीत.

एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या 8 महिन्यांपासून राज्यातील रुग्णालयांना सरकारकडून 889 कोटी रुपये थकीत आहेत. पैसे थकल्यामुळे जे लाभार्थी जनआरोग्य योजनेतून वैद्यकीय उपचार घेतात त्यांना हा लाभ मिळू शकणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारची आयष्मान भारत पंतप्रधान योजना आणि राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. हे उपचार झाल्यानंतर सरकारकडून या रुग्णालयांना पैसे दिले जातात. पण गेल्या 8 महिन्यांपासून तब्बल 889 कोटी रुपयांची बिले सरकराने रुग्णालयांना दिलीच नाहीत.

मुंबई आणि उपनगर जिल्ह्याचे 68.29 कोटी तर अहिल्या नगरचे 55 कोटी रुपये थकित आहेत. अशा प्रकारे संपूर्ण राज्यातून 889 कोटी रुपये थकित आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे हे पैसे अडकल्याची प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडली असून पुढील दोन ते चार दिवसांत हे पैसे त्या रुग्णालयांना दिले जातील असेही आबिटकर म्हणाले.