पॉलिसी काढली अन् विसरून गेले, एलआयसीकडे 880 कोटींची अनक्लेम रक्कम

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच एलआयसीकडे 880.93 कोटी रुपयांची अनक्लेम मॅच्युरिटी रक्कम पडून आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात 3,72,282 पॉलिसीधारक मॅच्युरिटीचा लाभ घेतला नाही. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली. अनक्लेम रकमेचे एलआयसी काय करते किंवा ज्यांनी रक्कम क्लेम केली नाही, ते आता कशा पद्धतीने क्लेम करू शकतात याविषयी जाणून घेऊया.

10 वर्षे क्लेम केला नाही तर…

दहा वर्षांहून अधिक काळ कोणतीही रक्कम क्लेम न केल्यास, संपूर्ण रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये हस्तांतरित केली जाते. अशी रक्कम नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्यासाठी वापरली जाते. विमा नियामन आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) एक हजार किंवा त्यापेक्षा अधिकची अनक्लेम रक्कम वेबसाईटवर प्रदर्शित करण्यास बंधनकारक केले आहे.

कसं कराल क्लेम

  • सर्वप्रथम एलआयसीच्या वेबसाइटवर जा.
  •  आता ग्राहक सेवा- ‘अनक्लेम अकाऊंट्स ऑफ पॉलिसी होल्डर्स’ हा पर्याय निवडा.
  •  यानंतर पॉलिसी क्रमांक, नाव (अनिवार्य), जन्मतारीख (अनिवार्य) आणि पॅन तपशील रिकाम्या जागेमध्ये भरा.
  •  आता सबमिट बटणावर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचे तपशील तपासता येतील.
  •  एलआयसी एजंटद्वारे किंवा आवश्यक कागदपत्रांसह एलआयसी कार्यालयात जाऊन दावा करू शकता.