नवीन वर्षात लगीन सराई धूमधडाक्यात, आठ महिन्यांत विवाहासाठी जवळपास 90 शुभमुहूर्त

‘यंदा कर्तव्य आहे’ म्हणत बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज असलेल्या वधू-वरांसाठी खुशखबर आहे. तुलसी विवाह झाल्यानंतर लगेचच विवाहासाठी अनुकूल काळ सुरू झाला आहे. नोव्हेंबरपासून जून-जुलैपर्यंत विवाहासाठी अनेक शुभ दिवस असून या आठ महिन्यांत विवाहाचे 85 ते 90 मुहूर्त असल्याचे ज्योतिष जाणकारांनी म्हटले आहे. त्यामुळे नवीन वर्षात जागोजागी लग्नांचा धूमधडाका पाहायला मिळणार आहे.

तुलसी विवाह झाल्यानंतर लगेच लग्नसोहळ्यांची चर्चा सुरू होते. इच्छुक वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांची मुहूर्तासाठी लगीनघाई होते. नवीन वर्षात लग्नसोहळ्यांसाठी बरेच मुहूर्त आहेत. आठ महिन्यांत लग्नासाठी जवळपास 90 मुहूर्त आहेत. जून-जुलैपर्यंत गुरू आणि शुक्र या ग्रहांची अस्त नाही. त्यामुळे लग्नाचे नियोजन करणाऱ्यांनी मुहूर्ताची चिंता करू नये, असे ज्योतिष जाणकारांनी म्हटले आहे. लग्न मुहूर्त जास्त असल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील बहुतांश लग्नाच्या हॉलचे बुकिंग जोरात सुरू आहे. अलीकडच्या काळात रजिस्टर्ड लग्नाऐवजी वैदिक पद्धतीने लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बहुतांश भटजींचेही बुकिंग ‘हाऊसफुल्ल’ होऊ लागले आहे. रजिस्टर्ड लग्नासाठी महिनाभर आधी सबरजिस्ट्रारकडे नोंदणी करावी लागते. त्यामुळे रजिस्टर्डऐवजी वैदिक पद्धतीने लग्न करण्याकडे कल वाढला आहे.

नवीन वर्षात लग्नसोहळ्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. लग्नासाठी साधारण 85 ते 90 मुहूर्त आहेत. त्याचबरोबर साखरपुडा, वधूचा गृहप्रवेश तसेच वास्तुशांतीसाठी भरपूर शुभमुहूर्त आहेत. शुभकार्यात गुरु आणि शुक्र या ग्रहांचा कुठलाही अडसर नाही.

– ल.कृ. पारेकर, ज्योतिष जाणकार

हल्ली लग्न जुळवून देणाऱ्या अनेक ऑनलाईन संस्था कार्यरत आहेत. त्या संस्था संकेतस्थळाच्या माध्यमातून लग्न जुळवून देण्याबरोबर इतर विधींचीही व्यवस्था करून देतात. त्यात ते भटजींची सेवाही उपलब्ध करून देतात. भटजींसाठी 30 ते 40 हजार रुपये घेतात. इतके पैसे मोजण्यापेक्षा वधू-वरांच्या कुटुंबीयांनी थेट भटजींना भेटावे आणि जास्तीचा खर्च टाळावा, असे आवाहन पुरोहित ल.कृ. पारेकर यांनी केले.  

आली लग्नघटी समीप…

आली लग्नघटी समीप नवरा… घेऊनी यावा घरा… शुभमंगल सावधान… अशी मंगलाष्टके भटजींनी म्हटली. उपस्थित वऱ्हाडींनी त्यांच्या सुरात सूर मिसळत सावधानचा गजर करत अक्षता अर्पण केल्या आणि तुळशीचे लग्न थाटामाटात पार पडले. गिरगावातील उरणकरवाडी येथे हा लग्नसोहळा झाला. वाडीतील सगळे रहिवाशी पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी झाले होते. लग्न लागल्यानंतर सगळयांना करंज्या, लाडू, पेढे असा मिष्ठान्नाचा फराळ देण्यात आला. यंदा उरणकरवाडी गणेशोत्सव मंडळ शतकमहोत्सवी साजरे करीत आहे. दिवाळीत रांगोळी स्पर्धा, दीपोत्सव आणि कार्तिक पौर्णिमेनिमित्त तुळशी विवाह असे सण थाटामाटात साजरे करण्यात आले. वर्षभर असेच उपक्रम जल्लोषात साजरे केले जाणार अशी माहिती वाडीतील रहिवाशी राजेश नारकर यांनी दिली.