आयआयटी मुंबईतील 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिक वेतनाची ऑफर

आयआयटी मुंबईतील 2023-24 या वर्षांच्या पहिल्या टप्प्यातील प्लेसमेंटचा समारोप झाला. यात देश-विदेशातील नामवंत कंपन्या आणि उद्योगांकडून आयआयटीतील 85 विद्यार्थ्यांना सीटीसीसह वार्षिक 1 कोटींहून अधिक रुपयांच्या वेतनाची ऑफर मिळाली आहे. यात जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमार्फत विद्यार्थ्यांना मोठय़ा वेतनाच्या ऑफर मिळाल्या. आयआयटीतील या प्लसमेंटमध्ये देश-विदेशातील 388 कंपन्या आणि उद्योग संस्थांनी भाग घेतला. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा विविध स्तरावर मुलाखती घेऊन त्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर देण्यात आल्या. यात अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 1 हजार 340 ऑफर विद्यार्थ्यांना मिळाल्या. त्यात 1 हजार 188 विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीनुसार ऑफर मिळाल्या. आयआयटीतील या प्लेसमेंटमध्ये प्रामुख्याने देश-विदेशातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आयटी, सॉफ्टवेअर, वित्त, बँकिंग, फिनटेस, व्यवस्थापन सल्लामसलत, डेटा सायन्स आणि विश्लेषण, संशोधन आणि विकास आणि डिझाइन या विषयांतील कंपन्या, उद्योग होते. तर यातील जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील कंपन्यांचा समावेश होता.