24 वर्षांपासून रस्ता सफाईचे अखंड व्रत; बंगळुरूच्या 83 वर्षीय वृद्धाने जिंकले मन

आपले घरच नव्हे तर आपण राहतो तो परिसर स्वच्छ असावा असे प्रत्येकाला वाटते, मात्र दुसरं कुणी येऊन परिसर स्वच्छ करेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच हातात झाडू घेऊन साफसफाई करणारे 83 वर्षीय सूर्या नारायण आज चर्चेचा विषय बनले आहेत. थोडीथोडकी नव्हे तर मागील 24 वर्षांपासून सूर्या नारायण यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे.

एचएसआर लेआऊट सेक्टर 2 च्या बाजूला असलेला 50 मीटरचा  रस्ता सूर्या नारायण यांच्या कामामुळे स्वच्छ, चकचकीत दिसतो. कुठेही कचरा, पालापाचोळा नाही… डाग नाहीत, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य नाही. ड्रेनेजची व्यवस्थाही एकदम चांगली. या साऱ्याचे श्रेय बंगळुरूच्या महापालिकेचे नसून वयाची ऐंशी पार केलेल्या सूर्या नारायण यांची आहे. हातात झाडू घेऊन साफसफाईचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांची चर्चा सुरू झाली.

ऑटोमोबाईल कंपनीत मॅनेजर असलेल्या सूर्या नारायण पत्नी जयंती यांच्यासह 2000 सालापासून एचएसआर लेआऊट भागात राहायला आले. त्याकाळी परिसराचा विकास झालेला नव्हता. या जोडप्याने वृक्षारोपण केले. हळूहळू तिथे हरित पट्टा तयार झाला. सूर्या नारायण यांना लहानपणापासून बागकामाची आवड होती. त्यामुळे त्यांनी आपल्या परिसरात अनेक झाडे लावली. जेव्हा ते सकाळी 6 वाजता मार्ंनग वॉकला बाहेर पडतात तेव्हा दोन तास घराभोवतीचा रस्ता स्वच्छ करतात. पावसाळय़ात तर या कामाला जास्त वेळ लागतो. कचरा हटवणे, पालापाचोळा दूर करणे अशी कामे या वयातही करतात.

सूर्या नारायण सकाळी लवकर उठून रस्त्यावरील पालापाचोळा गोळा करतात. त्याचा वापर करून बागेसाठी कंपोस्ट खत तयार करतात. या सगळय़ा कामामुळे आनंद मिळतो, चांगला व्यायाम होतो, असे सूर्या नारायण आणि त्यांच्या पत्नी जयंत सांगतात.

त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. या कौतुकामुळे प्रसिद्धीपासून दूर राहणारे सूर्या नारायण काहीसे ओशाळले. प्रसिद्धी नको, काम करायचंय, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.