चार मुले, तरी आई पोरकी; 80 वर्षीय आजी कुंभमेळ्यात बेपत्ता

चार मुले, त्यातील एक वकील, एक प्राध्यापक आणि दोघे आर्थिकदृष्टय़ा चांगल्या स्थितीत असूनही त्यांना आई पोरकी झाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळय़ात 80 वर्षीय रेखा द्विवेदी हरवल्या. विशेष म्हणजे त्यांच्या चार मुलांपैकी एकही मुलगा त्यांना घ्यायला आला नाही. गेल्या तीन दिवसांपासून कुंभमेळय़ात इतरत्र भटकत असलेल्या रेखा यांनी आपल्या वेदना मांडताना टाहो फोडला. ‘माझी मुले नालायक आहेत. मी कुठे आहे हे त्यांना माहितीही नाही. ते मला शोधतील एवढी त्यांना माया नाही’, अशी व्यथा या ‘माऊली’ने मांडली. त्या उत्तर प्रदेशातील न्यू कटरा येथील आहेत.

रेखा द्विवेदी यांना श्वसनाचा त्रास असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा एक मुलगा अलाहाबाद उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील आहे. दुसरा मुलगा महाविद्यालयात प्राध्यापक आहे. इतर दोन मुलांचीही आर्थिक स्थिती चांगली आहे. एका वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आजींच्या मुलांना फोन केला असता एकानेही फोन उचलला नाही. एका मुलाने फोन घेतला, मात्र आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचे असंवेदनशील उत्तर त्याने दिले.

तीन दिवसांपासून बेपत्ता

रेखा द्विवेदी यांना वयाच्या मर्यादेमुळे फार बोलताही येत नाही. त्यांचे शरीर पाठीच्या कण्याजवळ वाकलेले आहे. 12 फेब्रुवारी रोजी त्या कुंभमेळ्याला आल्या आणि गर्दीत बेपत्ता झाल्या. इतरत्र भटकत त्यांनी सेक्टर-9 येथे आसरा घेतला. आजूबाजूच्या लोकांनी विचारपूस केली असता त्यांनी हरवले असल्याचे सांगितले. मग कुंभमेळय़ातील ‘खोया पाया केंद्रा’ने त्यांच्या कुटुंबाची माहिती गोळा केली. पण त्यांना घ्यायला कोणीच आले नाही. आपबीती सांगताना आजी म्हणाल्या की, कुंभमेळय़ात कशी आले याची मलाही कल्पना नाही. मी याआधी नारायणी आश्रमात होते. माझा मुलगा शिवम कुठे राहतो हे मला कोणीच कळू दिले नाही. माझ्या मुलांना माझी काहीच किंमत नाही. माझ्या पतीची दोन लग्न झाली आहेत. मी एमए केले असून मुलांची चांगली देखभाल करता यावी यासाठी नोकरी केली नाही. शहरात एका चांगल्या शाळेत त्यांना शिक्षण दिले, पण आता सर्व काही बदलले आहे.

आमचा काहीही संबंध नाही

शिवम, प्रियम, दक्षम आणि सक्षम अशी रेखा यांच्या चार मुलांची नावे आहेत. यापैकी केवळ सक्षमशी ‘खोया पाया केंद्रा’तील अधिकाऱ्यांचा संपर्क झाला. सक्षमने सांगितले की, आमच्या वडिलांची दोन लग्न झाली आहेत. अनेक वर्षांपासून याप्रकरणी केस सुरू आहे. त्यामुळे आमचा याच्याशी काहाही संबंध नाही. आमचा लहान भाऊ दक्षम या वादामुळे घर सोडून गेला आहे. चौकशी झाली, पण काहीच निष्पन्न झाले नाही. म्हणूनच आता आमचा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. दरम्यान, रेखा द्विवेदी या सध्या कुंभ येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आहेत.