‘वंदे भारत’ला प्रवासी मिळेना! सिकंदराबाद-नागपूर मार्गावरील रेल्वेत 80 टक्के सीटस् रिकाम्याच

तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ‘वंदे भारत’ ट्रेनला प्रवासी मिळेनासे झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर ही ट्रेन रिकामीच धावेल. ही ट्रेन सिकंदराबाद-नागपूर मार्गावर धावते. सध्या तरी या ट्रेनच्या क्षमतेपैकी 20 टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. म्हणजे 80 टक्के सीट्स रिकाम्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे अधिकारीही हैराण आहेत. तेलंगणातील ही पाचवी वंदे भारत ट्रेन आहे. सिकंदराबाद – नागपूर मार्गावर वंदे भारत ट्रेन 16 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली. त्यामागे महाराष्ट्राच्या विदर्भ भागाला काजीपेट, सिकंदराबादला जोडणे हा उद्देश होता. ही ट्रेन जेव्हा सिकंदराबादहून नागपूरला निघाली, तेव्हा 1440 सीट्सपैकी 1200 हून अधिक सीट्स रिकाम्या होत्या. याशिवाय दोन एक्झिक्युटिव्ह क्लास कोचमध्ये असणाऱया एकूण 88 पैकी केवळ 10 सीट्स भरल्या होत्या.

 कोच कमी करण्याचा विचार

सिंकदराबाद-नागपूर मार्गावरील वंदे भारत ट्रेनला पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने या मार्गावरील रेल्वेचे कोच कमी करता येतील का, असा विचार आता रेल्वे अधिकारी करत आहेत. सध्या या मार्गावर धावणाऱया रेल्वेला 20 कोच आहेत. परंतु प्रवासी संख्या पाहता या रेल्वेला केवळ 8 कोच देण्याचा विचार अधिकारी करत आहेत. यामुळे सीट्सची जागा 500 ने कमी होईल.

भाडे अवाच्या सवा

वंदे भारत रेल्वेचे भाडे अन्य रेल्वेच्या तुलनेत भरमसाट आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांनी वंदे भारतकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मुंबई ते जालना या मार्गावरील जनशताब्दी एक्सप्रेसमधील एसी डब्याचे तिकीट 670 रुपये आहे. तर या तुलनेत वंदे भारतचे या मार्गावरील एसी डब्याचे तिकीट 1275 रुपये इतके आहे. याचाच अर्थ अन्य रेल्वेच्या तुलनेत वंदे भारतचे तिकीट दुप्पट आहे.