स्वयंतकचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, 22 किमीचे सागरी अंतर केले सव्वासहा तासांत पार

आठ वर्षीय स्वयंतक पाटीलने अर्नाळा ते वसई हे 22 किमींचे सागरी अंतर जलतरणाने पार करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीदिनी आगळय़ा पद्धतीने साहसी मानाचा मुजरा केला.

महाराष्ट्र शासनाने साहसी क्रीडा प्रकारात समावेश केलेल्या सागरी जलतरणात उमेळमानच्या स्वयंतक पाटीलने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला हे सुमारे 22 किलोमीटर अंतर जलतरण करून पार केले आहे.

स्वयंतकच्या जलतरणाची सुरुवात सकाळी 7 वाजता अर्नाळा किल्ला येथून झाली आणि त्याने दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी वसई किल्ला गाठला. त्याने हे अंतर अवघ्या 6 तास 21 मिनिटांमध्ये पार केले. आठ वर्षांचा स्वयंतक आगरी समाज विकास शिक्षण संस्थेच्या शाळेत तिसरीत शिकतोय. स्वयंतकला प्रशिक्षक राकेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले. बालपणापासूनच स्वयंतकला पोहण्याची आवड असल्याची माहिती प्राध्यापिका असलेली आई डॉ. लतिका पाटील यांनी दिली. स्वयंतकच्या साहसी जलतरणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जलतरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.