मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघाताची घटना शनिवारी पहाटे घडली. या अपघातात 18 प्रवाशी किरकोळ जखमी झाले तर 8 प्रवाशी गंभीर जखमी झाले. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना नवीन बोगद्यामध्ये अपघाताची घटना घडली. ट्रकमधील हवा कमी झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला तिसऱ्या लेनवर उभा होता. यादरम्यान मागून येणाऱ्या बाळूमामा कंपनीच्या खासगी बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकली.
बसमध्ये एकूण 38 प्रवाशी होते. अपघातात 18 प्रवाशी किरकोळ जखमी झाले तर 8 प्रवाशी गंभीर जखमी झाले. मनिषा भोसले, सुनिता तराळ, बालाजी सूर्यवंशी, संकेत घारे, अभिजीत दिंडे, सरिता शिंदे, संदीप मोगे, सोनाक्षी कांबळे अशी गंभीर जखमी प्रवाशांची नावे आहेत.