उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात वाळू भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला बांधलेल्या झोपडीवर पलटी झाला. या भीषण अपघातामध्ये साखरझोपेत असणाऱ्या एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले असून फक्त एक चिमुकली तेवढी वाचली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर ट्रक गंगा नदीकिनाऱ्यावरून वाळू भरून हरदोईकडे निघाला होता. मात्र प्रमाणापेक्षा जास्त वाळू भरल्याने चालकाचे नियंत्रणम सुटले आणि ट्रक पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने ट्रकखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. मात्र एक चिमुकली वगळता सर्वांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अवधेश उर्फ बल्ला (वय – 45), त्याची पत्नी सुधा उर्फ मुंडी (वय – 42), या दाम्पत्याची मुलगी सुनैना (वय – 11), लल्ला (वय – 5), बुद्धू (वय – 4), हिरो (वय – 22), करण (वय – 25) आणि कोमल उर्फ बिहारी (वय – 5) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात एक चिमुकली बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये बल्लाच्या घरी आलेली त्याची मुलगी, जावई आणि नातीचाही समावेश आहे. या अपघातातबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. बाहेर येऊन पाहतो तर शेजारील घरावर वाळूने भरलेला ट्रक पलटी झाला होता. यानंतर आम्ही पोलिसांना याची माहिती दिली.