भात सोहळ्यावरून परतताना बस-टेम्पोची धडक; 8 लहान मुलांसह 11 जणांचा जागीच मृत्यू

राजस्थानमधील धौलपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. करौली-धौरपूर महामार्ग NH-11B वर सुनीपूर गावाजवळ स्लिपर कोच बस आणि टेम्पोची धडक झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 लहान मुलं, 3 लहान मुलींसह दोन महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

आसमा (वय – 14), सलमान (वय – 8), साकिर (वय – 6), दानिश (वय – 10), अजान (वय – 5), आशियाना (वय. – 19), सुखी (वय – 7), सानिफ (वय – 9) अशी मृत्युमुखी पडलेल्या लहान मुलांची नावे आहेत. या अपघातात जरीना (वय – 35), जुली (वय – 32) या दोन महिलांचा आणि इरफान उर्फ बंटी (वय – 38) याचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बाडी सदर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या भागात घडला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण गुमट मोहल्ला येथील रहिवासी होते. बरौली येथे ते भात सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. हा सोहळा आटोपून घरी येत असताना हा अपघात झाला.

शहरातील करीम कॉलनीमध्ये राहणारे नहून आणि जहीर हे कुटुंबासोबत बरौली येथे गेले होते. भात सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर सर्वजण टेम्पोतून घरी परतत होते. रात्री सुनीपूर गावाजवळ एका स्लिपर कोच बसने टेम्पोला उडवले. यात 11 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये बसमधील प्रवासी, चालक, वाहक यांचा समावेश आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी बाडी रुग्णालयात पाठवले, तर जखमींवरही उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहनं पोलिसांनी जप्त केली असून हा अपघात कोणाच्या चुकीमुळे झाला याचा तपास सुरू आहे.

भात सोहळा

आपल्या देशामध्ये लग्नावेळी आणि त्याआधीही अनेक विधी केले जातात. राजस्थान आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये लग्नावेळी बहीण आपल्या भावाला पत्रिका देण्यासाठी जाते. यावेळी ती शिजलेला भात, गूळ सोबत नेते. तिथे नाच-गाण्याचा कार्यक्रमही होतो. याला भात सोहळा असे म्हणतात.