रागाच्या भरात घराबाहेर पडल्या अन् भरकटल्या; भोईवाडा पोलिसांनी केली सुखरूप घरवापसी

काहीतरी फिसकटलं आणि रागाच्या भरात 75 वर्षीय वृद्धा घराबाहेर पडल्या. टॅक्सीने त्या हिंदमाता येथे आल्या. पण नेमके जायचे कुठे तेच समजत नसल्याने चालकाने त्यांना तिथेच सोडले. त्या तेथील पोलीस चौकीबाहेर बसून राहिल्या. पोलिसांची त्यांच्यावर नजर पडली आणि जनाबाई कांबळे यांची सुखरूप घरवापसी झाली.

जनाबाई या वडाळय़ाच्या करीमवाडी येथे मुलगा व सुनेसह राहतात. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जनाबाई हिंदमाता येथील भोईवाडा पोलिसांच्या बीट चौकीबाहेर बसलेल्या होत्या. एक वृद्धा एकटय़ाच बसलेल्या असल्याची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार धुमाळ, अंमलदार पाटील व कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या वृद्धेकडे अधिक चौकशी केली असता त्या महिलेने तिचे नाव जनाबाई कांबळे असे सांगून  टॅक्सीने त्या त्याठिकाणी आल्याचे व टॅक्सीवाला तिथेच सोडून गेल्याचे म्हणाल्या. त्यांना त्यांचा पत्ता विचारला असताना त्यांना फक्त कस्तुरबा हॉस्पिटलसमोरील गल्लीमध्ये झोपडी एवढेच सांगता येत होते.  त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता त्या महिलेला तिचे नातेवाईक शोधत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जनाबाई यांच्या मुलाचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांना संपर्क केला असता वृद्धेच्या मुलाने वडाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी जनाबाई यांचा मुलगा अशोक व सुनेला भोईवाडा पोलीस ठाण्यात बोलावून जनाबाई यांना त्यांच्या ताब्यात दिले.