शासकीय स्पर्धांना एक कोटीचा निधी

कबड्डी, कुस्ती, खो-खो आणि व्हॉलीबॉल या राज्यशासनाच्या वतीने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना दिला जाणारा 75 लाखांचा निधी आता 25 लाखांनी वाढवण्यात आला आहे. म्हणजे पुढील वर्षापासून या चारही खेळांना आयोजनासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केली.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सुरू झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत राज्य अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱया महिला आणि पुरुषांच्या 16-16 संघांना स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनीय भाषणात पवार म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा व छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा या चार स्पर्धांचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी आगामी वर्षीपासून या चारही स्पर्धांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर करत असल्याची घोषणा केली.’

दोन वर्षांचे शिवछत्रपती पुरस्कार लवकरच – दत्ता भरणे

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मागील वर्षी रखडले होते. मात्र यावेळी 2022-23 आणि 2023-24 या दोन्ही वर्षांचे हे राज्य क्रीडा पुरस्कार या वर्षी लवकरच दिले जातील, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी दिली. मिशन ऑलिम्पिक, खेळाडूंची थेट नियुक्ती किंवा बालेवाडीतील ऑलिम्पिकमधील उभारणी अशी सर्वच कामे मार्गी लागली आहेत.