विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या 37 दिवसांच्या आचारसंहितेच्या काळात राज्यभरात 706 कोटी 98 लाखांची बेकायदा रोकड, दारू, अमली पदार्थ आणि सोने-चांदी जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे आचारसंहिता भंगाच्या 10 हजार 134 तक्रारी निकाली काढण्यात आल्या अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. आचारसंहितेच्या काळात काही गैरप्रकार घडू नयेत तसेच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसा, दारू, अमली पदार्थ व अन्य मार्गांचा वापर होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या 19 यंत्रणा सतर्क होत्या. त्यात पोलिसांबरोबर कस्टम, महसूल, उत्पादन शुल्क आदी यंत्रणांचा समावेश होता. या सर्व यंत्रणांनी राज्याच्या विविध भागांमध्ये तपासणीदरम्यान मोठय़ा प्रमाणात बेकायदा साहित्य जप्त केले.