दिल्लीत डेटिंग ऍपवरून 700 महिलांची फसवणूक

अमेरिकेतील मॉडेल असल्याचे भासवून डेटिंग ऍपवरून तब्बल 700 हून अधिक महिलांची फसवणूक करण्यात आल्याची घटना दिल्लीत घडली. दिवसा नोकरी आणि रात्रीच्या वेळी असा कारभार करणारा सायबर चोरटा तुषार सिंह बिष्टला (23) दिल्लीतून अटक करण्यात आली. अमेरिकेतील मॉडेल आहे असे सांगून त्याने महिलांची फसवणूक केली.

तुषार व्हर्च्युअल आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर वापरून तो डेटिंग साईट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी ओळख करत असे. तो ब्राझीलमधील एका मॉडेलचे फोटो आणि व्हिडीओ त्याने स्वतःच्या अकाऊंटवरून पोस्ट करून विश्वासार्हता मिळवण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने त्याने अनेक महिलांना गंडा घातला.

अशी करायचा फसवणूक

एखाद्या महिलेशी मैत्री करण्यात तुषारला यश आले की तो जवळीक साधत आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मागवायचा. पीडितांच्या नकळत त्यांचे फोटो तो त्याच्याकडे सेव्ह करत होता. नंतर संधीचा फायदा घेत खंडणी मागायचा. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करेन अशी धमकी देऊन पैसे मागायचा. पैसे न दिल्यास सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याची धमकी तो देत असे. त्याने बंबल या साईटवर जवळपास 500 आणि स्नॅपचॅट तसेच व्हॉट्सऍपवर 200 महिलांची फसवणूक केली. याप्रकरणी 13 डिसेंबर रोजी पश्चिम दिल्लीच्या सायबर पोलीस ठाण्यात एका पीडितेने तक्रार नोंदवली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला, असे पोलिसांनी सांगितले.