कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून डाव्या कालव्यात आज दुपारी 700 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले. उद्या (शुक्रवारी) पहाटे पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी पोहचणे अपेक्षित आहे. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पारनेरसह श्रीगोंदे, कर्जत तालुक्यांच्या कुकडी कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱयांकडून आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत आमदार नीलेश लंके यांनी आवर्तन सोडण्यासाठी कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य, सचिव तथा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे.
कुकडी कालवा व घोड प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याचे सन 2024 च्या उन्हाळी हंगामाचे आवर्तन हवामानाचा व पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱयांच्या गरजेनुसार पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला होता. या निर्णयाकडे लक्ष वेधत आमदार लंके यांनी 25 मे पासून आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली होती. सध्या कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्याने चारा पिके, फळबागा, इतर शेतीमाल जळण्याची भीती निर्माण झाली होती. आता आवर्तन सुटल्याने शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
…म्हणून आवर्तनास विलंब
z कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे प्रकल्पातील धरणांचे पाणी येडगाव धरणात एकत्र करून आवर्तन सोडण्याचा निर्णय अधिकाऱयांनी घेतला. पाणी एकत्रीकरणास वेळ लागल्याने आवर्तन सोडण्यास पाच दिवस उशीर झाल्याचे सांगण्यात आले. आवर्तन सोडल्याने शेतकऱयांना फायदा होणार आहे.