एमएमसी निवडणुकीतून 70 हजार डॉक्टरांची नावे गायब, 50 हजारांहून अधिक डॉक्टर मराठी; उमेदवारीपासूनही राहणार वंचित

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी होणार असून या निवडणुकीतून तब्बल 70 हजार डॉक्टरांना वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात 50 हजारांहून अधिक डॉक्टर हे मराठी असून हे डॉक्टर उमेदवारीपासूनही वंचित राहणार आहेत. दरम्यान, हजारो डॉक्टरांना मतदान आणि उमेदवारीपासून वंचित ठेवून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर आपल्या मर्जीतील डॉक्टरांची वर्णी लावण्यासाठी आणि मनमानी कारभार करण्यासाठी फडणवीस सरकारचा हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनांनी केला आहे.

वैद्यकीय परिषदेकडे जळपास दोन लाखांहून अधिक डॉक्टर नोंदणीकृत आहेत. 2022 मध्ये सर्व डॉक्टरांना नोंदणीसाठी वर्षभराची मुभा देण्यात आली होती, परंतु या कालावधीत सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांना नोंदणी करता आली नाही. दर पाच वर्षांनी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया सुरूच असते, मात्र अनेक डॉक्टर नूतनीकरण करणे विसरतात. त्यांना तारीख उलटून गेल्याचे लक्षात येत नाही. अशा वेळी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना ई-मेलद्वारे किंवा मेसेज करून कळवावे अशी मागणी डॉक्टरांची असल्याचे हिलिंग अ‍ॅण्ड युनिटी पॅनलचे समन्वयक डॉ. तुषार जगताप यांनी सांगितले.

मतदानासाठी सर्जरी सोडून यायचे का?

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी 3 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी मतदान रविवारी घेतले जायचे, परंतु यावेळी मतदान गुरुवारी आले आहे. इतर दिवशी अनेक महत्त्वाच्या आणि नाजूक शस्त्रक्रियाही असतात. अनेक डॉक्टरांना डय़ुटी सोडून कुठेही जाता येत नाही. अशा वेळी डॉक्टरांनी सर्जरी सोडून मतदानासाठी यायचे का, असा सवाल डॉक्टरानी केला आहे. दरम्यान, पाच वर्षांनी एकदा निवडणूक असते. त्यामुळे एक दिवस वेळ काढून मतदानासाठी यायलाच पाहिजे, असे निवडणूक अधिकारी शिल्पा परब म्हणाल्या.

म्हणे, 70 हजारांमध्ये अनेक डॉक्टर बाहेरचे

70 हजार डॉक्टरांचा आकडा दाखवण्यात येत आहे, परंतु यातील मोठय़ा संख्येने डॉक्टर बाहेरचे आहेत. अनेक डॉक्टर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानसह विविध राज्यांमध्ये गेले असून तिथेच प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे त्यांची नोंदणी झालेली नाही. तसेच नोंदणीचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी डॉक्टरांचीही आहे. त्यांना आठवण का करून द्यावी लागते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक रुग्वाणी विंकी मोहनलाल यांनी दिली.

निबंधक नोंदवही अद्ययावत करायला विसरले

डॉक्टरांच्या नोंदणीसाठीची नोंदवही अद्ययावत करण्याचे आपल्याकडूनच राहून गेल्याचे निबंधक महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे निबंधक डॉ. राकेश वाघमारे यांनी सांगितले. 70 हजार डॉक्टरांची नोंदणी करण्याची आणि निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी हिलिंग अ‍ॅण्ड युनिटी पॅनलच्या शिष्टमंडळाने निबंधकांकडे केली. डॉक्टर तुषार जगताप आणि ललितकुमार आनंदे शिष्टमंडळात होते. नोंदवही लवकरच अद्ययावत करू आणि कुणीही डॉक्टर मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करू, असेही डॉ. वाघमारे म्हणाले.