म्यानमार-थायलंड शक्तिशाली भूकंपानं हादरलं, बँकॉकमध्ये आणीबाणी; मोदींचा दौरा रद्द होण्याची शक्यता, सकाळीच झालेली घोषणा

म्यानमार आणि थायलंड शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरले आहे. 7.7 रिक्टर स्केलच्या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठी हानी झाली आहे. अनेक निर्माणाधीन इमारती, पूल कोसळले आहेत. घरांच्या भिंतीलाही तडे गेले असून रस्त्यांनाही भेगा पडल्या आहेत. काही लोक बेपत्ता असल्याचेही वृत्त आहे. या शक्तिशाली भूकंपानंतर थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप झाला. म्यानमारमधील Sagaing हे भूकंपाचे केंद्र आहे. या भूकंपाची तीव्रता एवढी होती की म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील जगप्रसिद्ध एवा पूलही कोसळल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. तसेच चीन, तैवान आणि बांगलादेशच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.

7.7 एवढ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे थायलंड आणि म्यानमारमधील अनेक इमारती अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. बँकॉकमध्ये निर्माणाधीन टॉवर्सही कोसळले असून एकाचा मृत्यू तर जवळपास 50हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. या भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इमारती कोसळत असताना लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत असल्याचे यात स्पष्ट दिसते.

बँकाकमध्ये आणीबाणी

थायलंडची राजधानी बँकाकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आले असून मेट्रो सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. शेअर बाजारातील ट्रेडिंगही थांबवण्यात आले असून विमानतळ आणि सब वे देखील बंद करण्यात आले आहेत.

मोदींचा दौरा रद्द होण्याची शक्यता

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ते 6 एप्रिल दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार होते. बँकॉकमध्ये होणाऱ्या बिम्सटेक शिखर संमेलनात ते सहभागी होणार होते. शुक्रवारी सकाळीच या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र भूकंपामुळे हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.