
सहाव्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने पहिल्याच दिवशी दोन मोठय़ा विजयांचे धमाके करत कबड्डीत आपला आवाज असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. तब्बल आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू झालेल्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या सत्रात हिंदुस्थानी महिलांनी बांगलादेशचा 64-23 असा धुव्वा उडवला होता, तर दुसऱ्या सत्रात थायलंडचा 76-21 असा फडशा पाडला. या दोन्ही महाविजयानंतर हिंदुस्थानने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तसेच यजमान इराण आणि नेपाळनेही आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. तसेच आज झालेल्या अन्य लढतींत यजमान इराणच्या महिलांनी आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी इराणची 58-13 अशी धुळधाण उडवली. तसेच हिंदुस्थानकडून मार खाणाऱ्या थायलंडने आपल्या सलामीच्या लढतीत मलेशियाचा 45-24 असा पराभव केला होता तर बांगलादेशने मलेशियाला 52-12 असे नमवले होते. त्याचप्रमाणे नेपाळने इराकवर 68-6 असा दिमाखदार विजय मिळवला होता.