झारखंडमध्ये 68 टक्के मतदान, 528 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया आणि शेवटच्या टप्प्यात 12 जिह्यांतील 38 जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 68 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात 528 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. बोगस मतदान झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन उमेदवार असलेल्या गांडेय विधानसभेच्या बूथ क्रमांक 282 आणि 338 च्या पोलिंग एजंट्सवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या बाजूने मतदानाची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. झारखंडमध्ये 14 हजार 218 मतदान केंद्रे असून त्यात 239 मतदान केंद्रे ही महिलाकेंद्रित आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केल्यापासून 200 कोटी रुपयांची अवैध रोकड आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. 2019 मध्ये झामुमो काँग्रेस आणि आरजेडी युतीने 47 जागा तर भाजपाने 25 जागा जिंकल्या होत्या.

झामुमो-भाजपमध्ये हाणामारी

गिरीडीह येथील हनी होली विद्यालयात 15,16 आणि 17 क्रमांकाच्या बूथवर झामुमो आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. एका पक्षाला एका विशिष्ट धर्माचे लोक बोगस मतदान करत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाजप समर्थक आक्रमक झाले. या गोंधळाची माहिती मिळताच झामुमोचे आमदार सुदिव्य कुमार सोनू तेथे आले आणि भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्यातील वाद हाणामारीवर गेला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत करून वातावरण शांत केले.

रिटार्ंनग ऑफिसरला अटक भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी देवघर जिह्यातील मधुपूर विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 111 वर पीठासीन अधिकाऱयाने कथित गैरवर्तन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार आणि मंत्री हाफिझुल हसन यांच्या बाजून अधिकाऱयाने पक्षपातीपणा दाखवला, असा दावा दुबे यांनी केला. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने कारवाई केली. संबंधित पीठासीन अधिकाऱयाला अटक करण्यात आली.

स्पष्ट बहुमत मिळेल

आम्हीच पुन्हा सत्तेवर येणार असा दावा सातत्याने महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत आहेत. अजित पवार यांनी तर महायुतीला किती जागा मिळतील याचेही भाकीत वर्तवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो दावा खोडून काढला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येईल आणि ते स्पष्ट बहुमताचे असेल असा ठाम दावा शरद पवार यांनी आज केला. महायुतीचे सरकार राज्यात येणार असून 175 जागा मिळतील असा दावा अजित पवार यांनी काटेवाडी येथे केला होता. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी सांगितलेल्या संख्येचा संदर्भ लक्षात घेता त्यांनी फक्त 175 जागा सांगितल्या, 280 सांगायला पाहिजे होत्या, असा मिश्कील टोलाही शरद पवार यांनी लगावला. महाविकास आघाडीच सत्तेवर येईल पण नेमक्या किती जागा येतील हे सांगायला आपण ज्योतिषी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकार आमचेच येणार

विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळय़ा दगडावरची रेष आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज व्यक्त केला. भाजपने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. तावडेंचा तो मतदारसंघ नसताना ते तेथे काय करत होते, असा सवाल पटोले यांनी केला. आर्वीचे भाजप उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत. या वानखेडेंच्या गोदामात दारूच्या बाटल्यांचा साठा सापडला. वर्ध्यात दारूबंदी असतानाही हा दारूसाठा कसा आला? मतदारांना पैसे व दारू वाटून मते मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे पटोले म्हणाले.