
किहीम समुद्र किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवाच्या 68 पिल्लांनी उंच उसळणाऱ्या लाटांमधून समुद्रात झेप घेतली. किहीम ग्रामस्थांनी या क्षणाचा अनुभव घेऊन आनंद साजरा केला. ऑलिव्ह रिडले जातीची कासवं मुंबई आणि अलिबागच्या समुद्र किनारी नाहीशी झाली होती. मात्र 40 वर्षानंतर कासवाने किहीम किनाऱ्यावर येऊन 150 अंडी दिली. त्यातील 68 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.
किहीम समुद्र किनारी मार्च महिन्याच्या सुरुवातीला ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने घरटे करून अंडी घातली होती. यांनतर मागील 52 दिवस किहिम ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र या घरट्यांचे रक्षण करीत होते. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घरट्यात हालचाल होत असल्याचे रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर एक एक पिल्लू घरट्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. 8 वाजेपर्यंत 68 पिल्ले बाहेर आली. या पिल्लांनी समुद्राच्या पाण्याकडे धाव घेतली. यावेळी कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्यासह किहीम ग्रामस्थ उपस्थित होते.
पिल्ले बाहेर पडताना घरट्यातील वाळू थोडीशी खचत असल्याचे पाहिल्यानंतर पिल्ले बाहेर येण्याची वेळ जवळ आलेली आहे, हे आमच्या लक्षात आले होते. त्यानंतर ओहटीची योग्य वेळ आणि तापमानाचा योग्य अंदाज घेत ही पिल्ले बाहेर आली. साधारण 120 पेक्षा जास्त अंडी एका मादीने घातलेली असावीत त्यामुळे आणखी साधारण 60 पिल्ले बाहेर येऊ शकतात.
– समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष अलिबाग.