नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर, नाशिक मध्य येथील वसंत गीते, देवळाली मतदारसंघातील योगेश घोलप, निफाडचे अनिल कदम, मालेगाव बाह्यमधील अद्वय हिरे आणि नांदगाव येथील उमेदवार गणेश धात्रक यांनी बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी बुधवारी अंदाजे 67.57 टक्के इतके मतदान झाले. मतदारांनी 196 उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंदिस्त केले. विशेषतः दिंडोरी, कळवण या भागात मतदारांमध्ये सकाळपासून उत्साह होता. काही ठिकाणी यंत्रातील बिघाडाने प्रक्रियेत थोडा वेळ खंड पडला हे वगळता शांततेत मतदान झाले असून, सर्वांचे लक्ष शनिवारच्या मतमोजणीकडे लागले आहे.
जिह्यातील 4 हजार 922 केंद्रांवर आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, प्रत्येकी एक शिपाई, पोलीस कर्मचारी असे 24 हजाराहून जास्त अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी काम करीत होते. केंद्राबाहेर काही अंतरावर मतदार सहायता कक्ष उभारलेले होते. त्याचबरोबर उमेदवारांच्या बूथवरही केंद्र आणि मतदार यादीतील अनुक्रमांक शोधण्यासाठी मतदारांची गर्दी असल्याचे चित्र होते. केंद्रांवर मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
जिह्यातील एकूण 50 लाख 61 हजार 185 मतदारांपैकी 30 लाख 42 हजार 364 जणांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केले, ही टक्केवारी 60.11 इतकी होती. सहा वाजेपर्यंत यात सरासरी सात टक्के वाढ झाली. शहरी भागात सकाळी मतदारांचा प्रतिसाद कमी होता, अकरा वाजेपासून सगळीकडे मतदानाने वेग घेतला. त्यामुळे केंद्रांवर रांगा होत्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मतदार सकाळपासूनच मोठय़ा संख्येने घराबाहेर पडल्याचे चित्र होते.
जिह्यात सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.93; अकरापर्यंत 18.82; एकपर्यंत 32.35, तीनपर्यंत 47.11 आणि पाच वाजेपर्यंत 60.11 टक्के मतदान झाले. दिंडोरीत पाच वाजेपर्यंत सर्वाधिक 71.97, तर सर्वात कमी मतदान नाशिक पूर्व मतदारसंघात 49.06 टक्के झाले होते.
‘व्हीव्हीपॅट’च्या तक्रारीने गोंधळ
इगतपुरी तालुक्यातील मौजे तळेगाव पेंद्रावरील व्हीव्हीपॅटविषयी एकाने तक्रार केली. मतदाराने मत दिले असता ते व्हीव्हीपॅटवर दुसऱयाच उमेदवाराला येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यामुळे तेथे काही वेळ गोंधळ उडाला. निवडणूक प्रशासनाने याची दखल घेतली. खात्री केली असता तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले.