ओमानचा हायकमिशनर म्हणवणाऱ्या 66 वर्षांच्या ठगाची तुरुंगात रवानगी

कृष्णा शेखर राणा… वय वर्षे 66 वृद्धत्वाकडे झुकत चाललेल्या उत्तर प्रदेशातील कृष्णा राणाच्या नाना लीलांनी सध्या गाझियाबादचे पोलीस चक्रावून गेले आहेत. 12 मार्चला राणाला ओमानचा हाय कमिशनर म्हणून फसवणूक करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. त्याआधी कुलगुरू म्हणून राणाने एक-दोन नव्हे तर तब्बल चार विद्यापीठांत सर्वोच्च पद भूषविल्याची माहिती समोर आली. तीही कोणतीही शैक्षणिक अर्हता नसताना. आग्य्रात त्याच्या कृष्ण ग्रुपच्या नावे अनेक कॉलेजेस आहेत. त्याचे उत्तर प्रदेशातील राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

काळय़ा रंगाच्या मर्सिडीजमधून फिरणाऱ्या या ठगाची इतपत मजल गेली की त्याने पत्र लिहून गाझियाबाद पोलीस आयुक्त आणि जिल्हा सत्र न्यायालयाकडेच विशेष सुरक्षेची मागणी केली. आपण ओमानचे हाय कमिशनर असून आपल्याला विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी त्याने केली होती. त्यासाठी त्याने बनावट लेटरहेडचा वापर केला.

वाहनावरील नंबरप्लेटही बनावट

त्याच्या वाहनावरील नंबरप्लेटही बनावट होती, पण ओमानचा समावेश कॉमनवेल्थ देशांमध्ये होत नसल्याने तिथे हाय कमिशनर असण्याचा प्रश्नच येत नाही, हे गाझियाबादचे पोलीस आयुक्त अजय कुमार मिश्रा यांच्या लक्षात आले. त्यामुळेच राणाचे पितळ उघडे पडले. ओमानचा हाय कमिशनर म्हणून राणाने मथुरा, फरिदाबाद, दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात विशेष अथिती म्हणून मानही मिळवला होता.