![IMG-20240601-WA0028-Ashish](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240601-WA0028-Ashish-696x447.jpg)
गाडय़ांना प्रेशर हॉर्न आणि मॉडीफाईड सायलन्सर लावून विनाकारण अनावश्यक आवाज करणाऱया चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. कानठळय़ा बसविणाऱया कर्णकर्कश आवाज करणाऱया वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांनी दंड थोपटले आहेत. पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवून सात हजारहून अधिक प्रेशर हॉर्न आणि मॉडीफाईड सायलन्सर जप्त केले आहेत.
बरेचजण वाहतुकीचे नियम पाळत नाही. काही अतिउत्साही लोकं आपल्या वाहनांना प्रेशर हॉर्न तसेच मॉडीफाईड सायलेन्सर लावतात. त्यातुन येणाऱया आवाजामुळे नागरिकांना मात्र विनाकारण असह्य करणारा आवाज ऐकावा लागतो. त्यामुळे याची गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी याविरोधात धडक मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत सहा हजार 540 प्रेशर हॉर्न आणि एक हजार 674 मॉडीफाईड सायलन्सर जप्त करण्यात आले. अशा प्रकारची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे असा इशारा देत नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.