म्हाडा मुंबई मंडळ सोडत 653 विजेत्यांना लवकरच घराचा ताबा

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील 653 घरांना एप्रिलमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विजेत्यांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. विशेष म्हणजे, या 653 घरांमध्ये म्हाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या पहाडी गोरेगाव येथील 332 घरांचा देखील समावेश आहे.

म्हाडाने गेल्यावर्षी 8 ऑगस्टला 2030 घरांसाठी जाहिरात काढली होती. त्यावेळी 2030 घरांपैकी 1673 घरे निर्माणाधीन होती. आतापर्यंत 1673 घरांपैकी 1020 घरांसाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. अंतर्गत कामे सुरू असल्याने 653 घरांना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. यापैकी मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पहाडी गोरेगाव येथील 332, दिंडोशी शिवधाम कॉम्प्लेक्स येथील 68, दिंडोशीतील शिवनेरी गृहनिर्माण संस्थेतील 153 घरांचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिलमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यात येणार आहे. तसेच 33 (5), 33 (7) अंतर्गत गृहसाठ्यातून मिळालेल्या 99 घरांनाही एप्रिलमध्येच भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत 212 जणांना घराचा ताबा

2030 घरांपैकी आतापर्यंत 1181 घरांसाठी विजेत्यांना देकारपत्र देण्यात आले आहे. त्यापैकी घराचे पूर्ण पैसे भरलेल्या 212 विजेत्यांना घराचा ताबा देण्यात आला आहे.