म्हाडाची डोकेदुखी वाढली, पंतप्रधान आवास योजनेतील 650 विजेत्यांनी घरे परत केली

सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना आणली, मात्र या योजनेकडे आता सर्वसामान्यांनीच पाठ फिरवलीय. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील 650 विजेत्यांनी आवास योजनेतील घरे घेण्यास नकार दिल्याने त्यांची अनामत रक्कम परत करण्याची नामुष्की म्हाडावर ओढावली आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील 9875 घरांच्या विक्रीसाठी ऑक्टोबरला जाहिरात काढली होती. बोळींज (विरार), खोणी (कल्याण), शिरढोण (कल्याण), गोठेघर (ठाणे) आणि भंडार्ली (ठाणे) येथील घरांचा यात समावेश होता. यातील सर्वाधिक घरे शिरढोण आणि खोणी येथे आहेत. 9875 घरांसाठी अनामत रकमेसह जेमतेम तीन हजारांच्या आसपास अर्ज आले होते. त्यातील 650 विजेत्यांनी आता घरे घेण्यास नकार दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकेशन न आवडणे किंवा पैशांची जुळवाजुळव न होणे अशा विविध कारणास्तव विजेत्यांनी ही घरे परत केल्याची चर्चा आहे.

जाहिरातबाजी सपशेल फेल

‘पीएमएवाय’च्या घरांना अर्जदारांचा सुरुवातीपासूनच अल्प प्रतिसाद मिळाल्याने आचारसंहिता संपताच लाखो रुपये खर्च करून या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने रेल्वे, सरकारी कार्यालय, पेट्रोल पंप अशा विविध ठिकाणी जाहिरातबाजी केली होती, मात्र ही जाहिरातबाजी सपशेल फेल ठरल्याचे दिसतेय.

पंतप्रधान आवास योजनेतील घरासाठी पात्र होण्याकरिता सहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसावे तसेच देशभरात कुठेही पक्के घर नसावे या प्रमुख अटी आहेत. या अटींमुळेच या घरांना अर्जदारांना अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या दोन्ही अटीत बसतील असे पात्र लाभार्थी तसेच त्यांना कर्ज उपलब्ध करून देणाऱया संस्था शोधणे हे म्हाडापुढे आता आव्हान असणार आहे, अन्यथा ही घरे धूळ खात पडण्याची शक्यता आहे.