खेळाला वयाचं बंधन नसतं! 64 व्या वर्षी महिला खेळाडूचं T-20 क्रिकेटमध्ये पदार्पण, रचला इतिहास

वयाचं बंधन मोडून एका 64 वर्षीय महिला खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करत साऱ्या क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. आराम करायच्या वयात या महिला खेळाडूने आपल्या तंदुरुस्तीची आणि आपल्या खेळाची झलक दाखवून इतिहास रचला आहे. जोआना चाइल्ड असे या महिला खेळाडूचे नाव असून पोर्तुगालच्या संघाकडून ती मैदानात उतरली.

पोर्तुगाल आणि नॉर्वे या महिला संघांमध्ये टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात पोर्तुगालकडून जोआना चाइल्ड यांनी पदार्पण केले. यापूर्वी त्यांनी कधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताच सामना खेळलेला नाही. पोर्तुगाल संघाच वैशिष्ट्य म्हणजे संघात 15 आणि 16 वर्षांच्या महिला खेळाडूंचा सुद्धा समावेश होता. सर्व वयोगटातील समावेश असलेल्या पोर्तुगालने या सामन्यात नॉर्वेचा 16 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पोर्तुगालने 109 धावा केल्या होत्या. प्रत्तुत्तरात नॉर्वेचा संघ 93 धावांमध्ये बाद झाला. या सामन्यात 64 वर्षीय जोआना यांना खास कामगिरी करता आलेले नाही. परंतु त्यांची खेळाप्रती असणारी आवड तरुणांना प्रेरणा देणारी ठरली.

जिबराल्टर संघाची सॅली बार्टन ही महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन करणारी सर्वाधिक वयाची महिला खेळाडू आहे. तिने वयाच्या 66 व्या वर्षी इस्टोनियाविरुद्ध सामना खेळला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वाधिक वयाच्या खेळाडूंच्या बाबतीत जोआना चाईल्ड या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.