गांजासह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तिघे ताब्यात

टेम्पोमधून 200 किलो गांजाची वाहतूक करणाऱया तिघांना 63 लाख 22 हजार 800 रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावर हत्ती बारव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संतोष पठाडे ( वय 35, रा. सम्राटनगर, वडगाव गुप्ता, एमआयडीसी, अहिल्यानगर), अक्षय भांड (रा. कोल्हार, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), सतीश काळे (वय 32, रा. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी याबाबत फिर्याद दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तीन इसम पांढऱया रंगाच्या टेम्पोमध्ये (एमएच-02, ईआर-4045) गांजा भरून जामखेड तालुक्यातील खर्डा येथून नगरच्या दिशेने विक्रीकरिता येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या अंमलदारांना मदतीस घेऊन कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार पथकाने नगर ते जामखेड रस्त्यावर हत्ती बारव परिसरात सापळा रचला असता, पांढऱया रंगाचा टेम्पो नगरच्या दिशेने येताना पथकास दिसला. पथकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवून टेम्पोची पाहणी केली. त्यामध्ये तीन इसम बसलेले दिसले. चौकशीदरम्यान तिघांनी आपली नावे सांगितली. त्यांची व टेम्पोची पंचासमक्ष झडती घेतली. संतोष पठाडे याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व टेम्पोमधून 47 लाख 92 हजार 800 रुपये किमतीचा 199.700 किलो ग्रॅम वजनाचा गांजा व 15 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 63 लाख 22 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ताब्यातील आरोपींकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत पोलीस पथकाने विचारपूस केली असता, त्यांनी जप्त केलेला गांजा समीर इनामदार (पूर्ण नाव माहीत नाही, रा. नगर) याच्यासोबत ओडिशा राज्यातून आणला असल्याची माहिती सांगितली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संतोष लोंढे, अतुल लोटके, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड, अरुण मोरे, विजय ठोंबरे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली.