
जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची (एचएसआरपी) सक्ती करण्यात आली आहे. मात्र सायबर गुन्हेगार या नवीन नंबर प्लेट्सची मागणी करणाऱ्या वाहनचालकांना बनावट वेबसाइट्सवरून ओटीपी पाठवत असल्याचे उघड झाले आहे. परिवहन विभागाने सहा बनावट वेबसाइट्सची माहिती जारी करून नागरिकांना सतर्क केले. अशा कोणत्याही साइट्सना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने नागरिक बनावट वेबसाइटला बळी पडत आहेत आणि फसवणूक होत आहे. बनावट वेबसाइट क्यूआर कोड तयार करून ओटीपी पाठवतात. ज्या वाहनचालकांना याबाबत अपुरी माहिती आहे, त्यांची सायबर गुन्हेगारांकडून शिकार होते. बनावट वेबसाइट्सबाबत राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयांत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
एचएसआरपी म्हणजे काय?
एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही अॅल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट असून या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेसर ब्रँडेड 10 अंकी पिन असतो. या नंबर प्लेटवर स्टिकरप्रमाणे दिसणारा होलोग्राम जोडण्यात येतो. त्यावर वाहनांचा सर्व तपशील ऑनलाइन नोंद होतो. विशेष म्हणजे ही नंबर प्लेट बनावट पद्धतीने बनवता येत नाही. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन प्रक्रिया करावी लागते.