मोठी बातमी: महिन्याभरापूर्वी कश्मीर खोऱ्यात 60 प्रशिक्षित घुसखोर शिरले, लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी दिली माहिती

terrorist

जम्मू कश्मीरमध्ये गेल्या महिनाभरापासून सतत दहशतवादी हल्ले, चकमकी सुरू असून आतापर्यंत महिनाभरात दहा जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे सध्या कश्मीर खोऱ्यातील वातावरण हे दहशतपूर्ण आहे. अशातच एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या महिनाभरात पाकिस्तानातून तब्बल 60 प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्र असलेले घुसखोर कश्मीर खोऱ्यात घुसले आहे. लष्कराचे माजी अधिकारी मेजर जनरल पी के सेहगल यांनी ही माहिती पीटीआयला दिली आहे.

”महिनाभरापूर्वी पाकिस्तानातून 60 प्रशिक्षित दहशतवादी कश्मीर खोऱ्यात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यातील काही जणांना आपण मारले आहे. मात्र अद्याप काही कश्मीर खोऱ्यात आहेत. आता त्यांना शोधून काढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ड्रोन्स, हेलिकॉप्टर्सच्या मदतीने त्यांचे लोकशन शोधून काढणे गरजेचे आहे. हे दहशतवादी प्रशिक्षित असून त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. त्यांच्याकडील मायक्रो सॅटेलाईट कम्युनिकेशन सेटमुळे त्यांचे लोकेशन मिळणे देखील कठिण असते, असे पी के सेहगल यांनी पीटीआयला सांगितले.

सोमवारी जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत. सध्या या भागात शोध मोहीम सुरू असून पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित कश्मीर टायगर्स या ग्रृपने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. याआधी 9 जुलैला कठुआ येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. तर 5 जवान जखमी झाले.