मालवणात शिवरायांचा 60 फुटी पुतळा सहा महिन्यांत अशक्य; कला संचालक आणि शिल्पकारांचे मत

मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यांमुळे मालवणच्या सर्जेकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या घटनेची जबाबदारी मिंधे सरकारने स्वीकारली नसली तरी सरकारची घिसाडघाईच पुतळा कोसळण्यास कारणीभूत होती असे नंतरच्या घटनाक्रमाने सिद्ध झाले. आता तसाच घाईघाईत तिथे नवा पुतळा उभारण्याचा घाट सरकारने घातला आहे. अवघ्या सहा महिन्यांत शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारण्यासाठी निविदा काढल्या गेल्या आहेत. मात्र इतक्या कमी कालावधीत 60 फुटी मजबूत पुतळा बनवणे शक्यच नसल्याचे मत राज्याचे कला संचालक आणि शिल्पकारांनी मांडले आहे.

मालवणच्या सर्जेकोटवरील शिवपुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे सध्या गजाआड आहे. आपटेला मोठे पुतळे बनवण्याचा अनुभव नसतानाही केवळ पेंद्र सरकारमधील भारतीय जनता पक्षाशी जवळीक असल्याने त्याला ते काम देण्यात आले होते. कोटय़वधींचा खर्च करून काही महिन्यांत आपटेने पुतळा उभारला आणि आठ महिन्यांतच तो कोसळला. असंख्य शिवप्रेमींची मने त्यामुळे दुखावली गेली.

मिंधे सरकारने आता नव्या पुतळय़ासाठी निविदा काढल्या आहेत. त्यात पुतळय़ासाठी 100 वर्षांच्या गॅरंटीची अट घातली गेली आहे. शिवरायांच्या पुतळय़ाची पायाच्या अंगठय़ापासून ते डोक्यापर्यंत उंची 60 फूट असेल असे निविदेच्या तपशिलात म्हटले आहे. या पुतळय़ाच्या उभारणीसाठी 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आधीच्या पुतळय़ासाठीच दोन वर्षे मागितली होती – संजीव संकपाळ

‘सहा महिन्यांत 60 फूट उंच पुतळा उभारणे शक्यच नाही. त्यासाठी किमान दोन वर्षे तरी पाहिजेत. मॉडेल तयार करणे, त्याचे पासिंग होऊन पुतळा बसणे सहा महिन्यांत शक्यच नाही,’ असे प्रसिद्ध शिल्पकार संजीव संकपाळ यांनी सांगितले. थ्रीडी मॉडेल बनवून कास्टिंग करण्याची पद्धत त्यासाठी वापरावी लागेल, असेही ते म्हणाले.

मालवणमधील पुतळा उभारण्यासाठीही संजीव संकपाळ यांच्याशी सरकारने संपर्क साधला होता. त्याचे ड्रॉइंगही त्यांनी बनवून दाखवले होते, पण त्यांनी दोन वर्षांचा कालावधी मागितला होता. त्याबाबत सांगताना ते म्हणाले की, ‘मालवणमधील वातावरण आणि पुतळय़ाची जागा लक्षात घेता तिथे महाराजांचा बसलेला पुतळाच योग्य आहे. पण महाराज आरमाराचे नेतृत्व करताहेत अशा आवेशातल्या उभ्या पुतळय़ाची तिथे संकल्पना होती. अगदीच घाई असेल तर अठरा महिने लागतीलच, असेही मी त्यावेळी स्पष्ट केले होते.’

संजीव संकपाळ यांनी आतापर्यंत अनेक उंच पुतळे बनवले आहेत. सध्या ते छत्रपती संभाजी महाराज यांचा 23 फुटी पुतळा उभारत आहेत. तो कराड येथे स्थापन केला जाणार आहे.

इतक्या कमी कालावधीत पुतळा कोण उभारणार – राजीव मिश्रा

सहा महिन्यांमध्ये 60 फुटी पुतळा उभारणे जवळजवळ अशक्यच आहे, असे स्पष्ट मत राज्याचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, इतक्या कमी कालावधीत पुतळा कोण उभारणार हेसुद्धा महत्त्वाचे आहे. शिल्पकाराकडे पुतळा उभारण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी असायला हव्यात. पुतळा बनवताना तो वेगवेगळय़ा भागांमध्ये बनवला जातो आणि नंतर कास्टिंगने त्याची जोडणी होते. महापुरुषांचा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकारही त्या लायकीचा आणि अनुभवी असायला हवा. हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही.