पालिका दिव्यांगांना देणार दर सहा महिन्यांनी 6 ते 18 हजारांचे अर्थसहाय्य दरवर्षी 111 कोटींची तरतूद

दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत मुंबईतील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजना राबवण्यात येत आहे. 2024-25 ते 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजनेअंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे 60 हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी 111.83 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) असणे आवश्यक आहे.

मुंबईत कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना याचा लाभ घेता येणार आहे.

असा मिळणार लाभ
योजनेअंतर्गत वय वर्ष 18 वरील 40 टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशेबाने दर सहा महिन्यांनंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच वार्षिक 12 हजार रुपये मिळतील. तसेच 80 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशेबाने दर सहा महिन्यांनंतर एकत्रित 18 हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये मिळतील.

असा करा अर्ज
पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in येथे About BMC – Departments – Department Manuals-Assistant Commissioner Planning-Docs- दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (2024-25 ते 2028-29)’ यावर क्लिक केल्यास तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल. योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही. भरलेले अर्ज संबंधित विभाग कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जमा करावेत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.