Delhi Rain Update : दिल्ली विमानतळावरील छत कोसळले, अनेक गाड्या दबल्या; एकाचा मृत्यू, 6 जखमी

दिल्ली-एनसीआरमध्ये कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे घामाने डबडबलेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला असला तरी पहिल्याच पावसामुळे नागरिकांच्या समस्याही वाढल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील रस्ते जलमय झाले. तसेच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘टर्मिनल-1’चे छत कोसळले. याखाली अनेक गाड्या दबल्या असून सहा जण गंभीर जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

छत कोसळल्याची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, शुक्रवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास आम्हाला दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-1 वर छत कोसळल्याची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाड्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.

या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात छताचा लोखंडी साचा गाड्यांवर कोसळल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेमुळे टर्मिनल-1 वर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे येथील सेवा तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आल्या असून सुरक्षेचा उपाय म्हणून चेक इन काउंटरही बंद करण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली आहे. दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-1 वर छत कोसळल्याच्या घटनेवर लक्ष ठेऊन असून घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमुळे टर्मिनल-1 वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश विमानतळ प्रशासनाला दिले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असून बचावकार्य सुरू आहे, असे ट्विट नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी केले.

दिल्ली जलमय

दरम्यान, पहिल्या पावसात दिल्ली जलमय झाली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच पुलाखाली पाणी साचल्याने काही गाड्याही त्यात अडकल्याचे दिसत आहे.