
आपल्या कॅरम कारकीर्दीत दोनदा जगज्जेता आणि तीनदा राष्ट्रीय विजेता ठरलेल्या मुंबईच्या पंकज पवारने पुन्हा एकदा आपला पॉवरफुल्ल खेळ दाखवला. त्याने पाचव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईच्याच प्रशांत मोरेवर पहिला सेट गमावल्यानंतरही 16-25, 25-14, 25-20 अशी मात करत आपल्या कारकीर्दीतील रौप्य महोत्सवी जेतेपद पटकावले. महिलांच्या गटात मुंबईच्याच काजल कुमारीने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला नमवत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.
पार्लेश्वर रोटरी क्लब आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीने आयोजित केलेल्या स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीचे अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले. पंकज पवार आणि प्रशांत मोरे यांच्यात झालेल्या सामन्यात प्रशांतने पहिला सेट 25-16 असा जिंकत सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही प्रशांत 12-11 असा आघाडीवर होता, मात्र त्यानंतर सातव्या बोर्डात व्हाइट स्लॅमची नोंद करत पंकजने दुसरा सेट 25-14 असा जिंकत सामन्यात पुनरागमन केले. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्येही प्रशांत 20-16 असा आघाडीवर होता, पण येथेही पंकजने पॉवरफुल्ल खेळ करत सातव्या बोर्डात 10 गुणांची कमाई करत हा सेट 25-20 असा सेटही जिंकला आणि जेतेपदही पटकावले.
तत्पूर्वी अंतिम फेरीत प्रवेश करताना पंकजने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला 20-19, 17-4 असे तर प्रशांतने मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरला 25-22, 14-22 व 22-12 असे हरवले होते. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला 6 -23, 24-6 व 21-16 असे हरवून विजय नोंदविला. तिसऱ्या सेटमध्ये सातव्या बोर्डनंतर काजलकडे केवळ 3 गुणांची आघाडी होती, परंतु ब्रेकचा फायदा घेत अनुभवी काजलने शेवटचा बोर्ड दोनचा मिळविला आणि निसटता विजय प्राप्त केला.