Jammu Kashmir Election – जम्मू कश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 58 टक्के मतदान, पुलवामात सर्वात कमी मतदानाची नोंद

जम्मू कश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर निवडणूक घेण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 58 टक्के मतदान झाले आहे. ज्या पुलवामात पाच वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता त्या भागात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.

2019 साली केंद्र सरकारने जम्मू कश्मीर मधले कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून निवडणुकीला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात कश्मीरच्या 16 आणि जम्मूच्या 8 जागांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सुरक्षा दलांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक आयोगाने विस्थापित कश्मिरी पंडितांसाठी विशेष व्यवस्था केली होती. कश्मीरमधून विस्थापित झालेले आणि दिल्ली, जम्मू आणि उधमपूरमध्ये स्थायिक झालेल्या कश्मिरी पंडितांसाठी मतदानासाठी विशेष केंद्रांची सोय करण्यात आली होती. विस्थापित कश्मिरी पंडितांसाठी दिल्लीत 4, जम्मूमध्ये 19 आणि उधमपूरमध्ये 1 मतदान केंद्र बनवण्यात आले होते.

58 टक्के मतदान
जम्मू कश्मीर विधानसभेसाठी संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत एकूण 58.58 टक्के मतदान झाले आहे. किश्तवाड मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 77.23 टक्के मतदान झाले आहे. तर पुलवामामध्ये 46.03 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

 

13 पक्षांमध्ये लढत
जम्मू कश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्यातले मतदान आज पार पाडले गेले. दुसरा टप्प्याचे मतदान 25 सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. 90 जागांसाठी 13 पक्ष मैदानात आहेत.