राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो: महाराष्ट्राची जोरदार विजयी सलामी

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी 57 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत जोरदार खेळ करत दमदार सलामी देत पहिला दिवस गाजवला. पुरुष संघाने लडाख व पंजाबचा पराभव करून गटात आघाडी घेतली, तर महिला संघाने तेलंगणावर प्रभावी विजय मिळवत चुरस निर्माण केली. यंदा ही राष्ट्रीय स्पर्धा अल्टिमेट लीग पद्धतीने खेळवली जात असल्याने रोमांचक लढती पाहायला मिळत आहेत. पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने तेलंगणाचा 29-12 असा एक डाव राखून 17 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने 8 गडी बाद करत आक्रमणात चमक दाखवली. संध्या सुरवसे आणि दीपाली राठोड यांनी उत्कृष्ट बचाव केला. संपदा मोरे व सुहानी धोत्रे यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पहिल्या सामन्यात लडाखचा 46-20 असा एक डाव व 26 गुणांनी धुव्वा उडवला.