
57 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी साखळी स्पर्धेतील सर्व सामने जिंकत गटात अव्वल स्थान राखले आणि अपराजित कामगिरीसह उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याचबरोबर कोल्हापूर आणि विदर्भच्या संघांनीही पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्राच्या संघांचा झंझावात कायम होता. साखळी फेरीत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दादरा आणि नगर हवेली संघावर 54-20 असा एक डाव राखून 34 गुणांनी विजय मिळवला. यात दादरा नगर हवेलीच्या आक्रमकांना महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला बाद करून गुण मिळविता आला नाही. महाराष्ट्राचे सर्व खेळाडू संरक्षण करून निवृत्त झाले. यात प्रतीक वाईकर, अनिकेत चेंदवणकर व ऋषिकेश मुर्चावडे यांनी अष्टपैलू खेळ केला. शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने तामीळनाडूस 33-24 असे 9 गुण व 4.59 मि. राखून नमविले. यात मिलिंद चवरेकरने 8 गडी टिपले.
महाराष्ट्र महिला संघाची विजयी मालिका
महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने जम्मू-कश्मीरचा 53-10 असा एक डाव राखून 43 गुणांनी पराभव केला. या सामन्यातसुद्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जम्मू-कश्मीरला खेळाडू बाद करून एकही गुण मिळवू दिला नाही. दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाबवर 32-11 असा 21 गुणांनी पराभव केला. प्रियांका इंगळे, संध्या सुरवसे व रेश्मा राठोड यांनी संघाच्या विजयात अष्टपैलू खेळी केली.
महिलांच्या अन्य एका सामन्यात विदर्भ संघाने मध्य हिंदुस्थानवर 37-20 असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली.
असे होणार उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने
पुरुष ः महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र पोलीस, कोल्हापूर विरुद्ध दिल्ली, विदर्भ विरुद्ध केरळ.
महिला ः महाराष्ट्र विरुद्ध केरळ, कोल्हापूर विरुद्ध राजस्थान, विदर्भ विरुद्ध दिल्ली.